Friday, April 26, 2024
Homeनगरनियम अटींसह साई प्रसादालय व ऑफलाईन दर्शन सुरू करावे - बानाईत

नियम अटींसह साई प्रसादालय व ऑफलाईन दर्शन सुरू करावे – बानाईत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

करोना नियम व अटींचे पालन करून साई प्रसादालय व ऑफलाईन दर्शन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष अमोल बानाईत यांनी केली आहे.

- Advertisement -

श्री. बानाईत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री साईबाबांचे मंदिर साईभक्तांसाठी दर्शनाला खुले झाले आहे. त्यामुळे साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. साईबाबांची दर्शन व्यवस्था व्यवस्थित होत असल्याने साईभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु ऑनलाईन दर्शन व्यवस्थेमुळे आजही अनेक भाविकांना शिर्डीतून पासही मिळत नसल्याने समाधीचे दर्शन घेऊन माघारी जावे लागत आहे.

जे काही साईभक्त ऑनलाईन दर्शन पास बुकिंग करून दर्शन घेत आहेत त्यांना काही काळ्या बाजाराला सामोरे जावे लागत असून काळा बाजार करणार्‍यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पास विकत घ्यावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे प्रकार टाळण्यासाठी सध्याच्या ऑनलाईन व्यवस्थेबरोबरच शिर्डीमध्ये येणार्‍या साईभक्तांना ऑफलाईन दर्शन व्यवस्था सुरू केल्यास त्यांना साईबाबांच्या दर्शनास मुकता येणार नाही. देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या भक्तांना समाधी दर्शन विनाअडथळा मिळेल. त्यांची आर्थिक लूटमार थांबेल. मागील लॉकडाऊननंतर सुद्धा ऑफलाईन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली होती.

तसेच संस्थानचे साईप्रसादालय सुरू झाल्यास गरजू साईभक्त, गरीब लोकांना प्रसादाचा लाभ घेता येईल. या बाबींचा विचार करता आपण सर्व कोव्हीड नियमांचे पालन करून साई प्रसादालय व ऑफलाईन दर्शन व्यवस्था सुरू करावी असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रहार संघटनेचे युवक अध्यक्ष महेश गायकवाड, कार्याध्यक्ष विकी व शिर्डी शहराध्यक्ष अमोल बानाईत यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या