Tuesday, April 23, 2024
Homeनगर31 डिसेंबरला साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

31 डिसेंबरला साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून साईबाबांच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री. मुगळीकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणार्‍या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणार्‍या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 31 डिसेंबर रोजीची शेजारती व दिनांक 1 जानेवारी 2020 रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

- Advertisement -

तसेच नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवार दिनांक 25 डिसेंबर, मंगळवार दिनांक 31 डिसेंबर व बुधवार दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी असे 03 दिवस श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील याबरोबरच मंगळवार दिनांक 31 डिसेंबर व बुधवार दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी असे 2 दिवस वाहन पूजा बंद राहतील.

याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी असे सांगुन मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही श्री.मुगळीकर यांनी केले. महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या