Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डीत साईबाबा पालखी सोहळा अचानकपणे रद्द, ग्रामस्थ नाराज

शिर्डीत साईबाबा पालखी सोहळा अचानकपणे रद्द, ग्रामस्थ नाराज

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

विश्वाला श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्‍या शिर्डीतील श्री साईबाबांचा पालखी सोहळा श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने अचानकपणे रद्द केल्याने शिर्डी ग्रामस्थांसह करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून साईबाबा संस्थान प्रशासनाने ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान देशातील नंबर दोनशे श्रीमंत देवस्थान म्हणून नावारूपास आलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने प्रत्येक गुरुवारी द्वारकामाई ते चावडी तसेच चावडी ते साईसमाधी मंदिरापर्यंत नित्यनियमाने काढण्यात येणारी श्री साईबाबांची पालखी काल गुरुवार दि.17 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे रद्द केल्याने शिर्डी ग्रामस्थांसह देश-विदेशातील करोड भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार दि.17 मार्च ते 22 मार्च पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा ओमायक्रोन व्हेरीएंटचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. असे असले तरी काल दि.17 मार्च रोजी राज्य सरकारच्या गृह विभागाने होळी संदर्भात जारी केले नियम अटीशर्ती मागे घेतले असून प्रतिबंधात्मक निर्बंध हटविण्यात आले आहेत.

त्यामुळे साई संस्थांनने साईबाबांचा पालखी सोहळा बंद न करता सुरू ठेवला पाहिजे होता असे मत शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत. कोरोना काळात तब्बल दोन वर्ष पालखी सोहळा बंद करण्यात आला होता. मागील गुरुवारी दि.10 मार्च रोजी साई संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे आणि त्यांचे सहकारी विश्वस्त मंडळ त्याचबरोबर प्रशासन यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालखी सोहळा सुरू करून दिला होता.पालखी सुरू झाल्याने करोडो भाविकांनी समाधान व्यक्त करत आपापल्या प्रतिक्रिया सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमांना दिल्या होत्या.मात्र काल गुरुवारी पालखी सोहळाचा दुसर्‍या गुरुवारीच पुन्हा पालखी अचानक रद्द केल्याने ग्रामस्थांमध्ये तसेच साई भक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून संस्थान प्रशासनाच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पालखी सोहळा बंद करण्याबाबतचे ठोस कारण संस्थान प्रशासनाने कळवावे अशी मागणी ही करण्यात आली आहे.

प्रमुख उत्सवात जमावबंदी कलम 37 लावण्यात येतो याचा अर्थ असा नाही की, पालखी सोहळा रद्द करणे, नियम अटीशर्तीचे पालन करून पालखी काढणे आवश्यक होते तसेच दि.17 रोजी राज्य सरकारने सदरील निर्बंध हटवीले आहेत. विश्वस्त मंडळाची नियुक्ती शासनाने केली आहे.साईबाबांचा पालखी सोहळा रद्द करताना विश्वस्त मंडळाला कळविले नाही ही शोकांतिका आहे.साईबाबांना भक्त प्रिय आहे,भक्तांना देखील बाबांप्रती श्रद्धा आहे.परंतु त्या श्रद्धेपेक्षाही काही लोकांना याठिकाणी बाबांचे मालक होण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसून येत आहे.त्यामुळे कालचा पालखी सोहळा रद्द केला हे नवल वाटले आहे.

– सचिन गुजर, विश्वस्त श्री साईसंस्थान शिर्डी

करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. पूर्वीसारखी परिस्थिती नसताना साईबाबांची पालखी थांबवणे योग्य नाही. पालखी नियमित सुरू राहावी हि भाविकांची अपेक्षा आहे. बाबांच्या पादुकांचे दर्शन यानिमित्ताने असंख्य साईभक्तांना होते. दर गुरुवारी भावीक पालखीच्या अपेक्षेने शिर्डीत दाखल होतात. मात्र अचानकपणे अशाप्रकारे पालखी रद्द झाल्याने साईभक्तांचा हिरमोड होतो. म्हणून शासनाने पालखी तसेच साईबाबांचे उत्सव रद्द करण्यापूर्वी आठ-दहा दिवस प्रसारमाध्यमांमार्फत सूचना जारी कराव्यात.

– शिवाजी गोंदकर, मा.नगराध्यक्ष शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या