Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेतकर्‍यांची वीज तोडून पोटावर मारू नका - रोहोम

शेतकर्‍यांची वीज तोडून पोटावर मारू नका – रोहोम

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यातील महायुतीचे सरकार आणि उर्जामंत्री व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेतकर्‍यांची कुचेष्टा करून त्यांच्या वीज जोडण्या थकीत वीज बिलाअभावी तोडण्याचा सपाटा लावला आहे. तेव्हा वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांच्या ऐन रब्बी हंगामातील मोसमात असे टोकाचे पाऊल उचलू नये अन्यथा याविरूध्द रस्त्यावर येवून संघर्ष करावा लागेल, असा इशारा भाजपचे कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिला आहे.

- Advertisement -

श्री. रोहोम यांनी यासंदर्भात शासन व उर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नाशिक येथील वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता, संगमनेर येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वीज बिल थकले म्हणून पुरवठा तोडण्याची मोहिम कोपरगाव मतदार संघात एकीकडे सुरू आहे तर पाच महिन्यांपासून शेतकर्‍यांचे नादुरूस्त वीज रोहित्र दुरूस्त होवून मिळत नाही अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला असून अजब तुझे महायुतीचे सरकार, अशी म्हणण्याची पाळी आली आहे.

करोना महामारीचे संकट आणि दुसरीकडे चालु हंगामात खरीप पिकाचे पुन्हा झालेले नुकसान या कचाट्यात शेतकरी सापडला आहे. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना मतदार संघातील शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ भेटून त्यांनी याबाबतच्या व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यांनीही वीज वितरण खात्याच्या अधिकार्‍यांकडे व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या प्रश्नाची कड लागावी म्हणून विनंती केलेली आहे.

रब्बी हंगाम आता ऐन मोसमात आहे. त्यासाठी शेतकरी स्वत:जवळील तसेच पत्नीचे दाग दागिने गहाण ठेवुन, कर्ज काढुन पीक लागवडीची तयारी करत आहे. उशिरा पर्जन्यमान झाल्याने विहिरींनाही पाणीही बरे आहे. पण वीज वितरण कंपनीने या शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची आगावू सूचना न देताच त्यांच्याकडे थकीत वीज बिलाची रक्कम मागणी न करताच परस्पर वीज रोहित्राचा पुरवठा खंडीत करून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडुन त्यांच्या पोटावर मारण्यांचा सपाटा लावला आहे.

वीज खंडीत झाली तर शेतकरी रब्बी पिक लागवडीस पाणी देवु शकणार नाही. पाणी मिळाले नाही तर त्याचे उत्पन्न काहीच निघणार नाही. परिणामी अन्य नगदी पिकांचे नुकसान होईल. त्याच्या दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी तो करू शकत नाही. यासाठी शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेवुन तात्काळ वीज रोहित्रांचा पुरवठा खंडीत करण्याची मोहिम स्थगित करावी.

कोपरगांव मतदार संघातील भोसले (वेळापुर) वीज रोहित्र, मोहन वाबळे (सुरेगांव) वीज रोहित्र, शिंदे (हंडेवाडी) रोहित्र, विनोद सोनवणे (सोनारी) रोहित्र, गावठाण वीज रोहित्र (सोनारी), चरमळ वीज रोहित्र (पढेगाव), धोंडेवाडी काकडी वीज रोहित्र यासह अनेक वीज रोहित्र चार ते पाच महिन्यांपासून जळीत होवून बंद आहेत. ते दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीकडे पाठवुनही त्याची अद्यापही दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल येथील शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.

त्याचा उद्रेक कधी होईल याचा नेम नाही. तेव्हा वीज वितरण कंपनीने येथील वस्तुस्थिती समजावून घेवुन वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम थांबवावी व पाच महिन्यापासून बंद असलेले वीज रोहित्र तात्काळ संबंधित ठिकाणी लावून वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा याविरूध्द नाईलाजास्तव रस्त्यावर येवून संघर्ष करावा लागेल, असा इशारा शेवटी साहेबराव रोहोम व सर्व भाजपा सेलच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या