Monday, April 29, 2024
Homeनगरकेशर आंब्यातून उसापेक्षा जादा उत्पन्न - डॉ. भगवानराव कापसे

केशर आंब्यातून उसापेक्षा जादा उत्पन्न – डॉ. भगवानराव कापसे

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

एक एकर फळबाग लागवडीसाठी एकरी 1.25 लाख रुपये लागवड खर्च येतो.केशर आंबा लागवड केल्यास तिसर्‍या वर्षी 2 टन तर चौथ्या वर्षांपासून 6 टन आंब्याचे 4 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे केशर आंबा लागवडीतून उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळविणे शक्य असल्याचे प्रतिपादन आंबा पीक शास्रज्ञ डॉ.भगवानराव कापसे यांनी केले.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील रांजणगावदेवी येथे महाकेशर आंबा बागायतदार संघ व चैतन्य अग्रोव्हेट अण्ड रिसर्च फाऊंडेशन आयोजित आंबा लागवड ते निर्यात चर्चासत्रात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना डॉ.कापसे बोलत होते. महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदकुमार काळे हे चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

संघाचे उपाध्यक्ष अंकुशराव कानडे, संचालक अशोकराव सूर्यवंशी, त्रिंबक पाथरीकर, द्वारकदास पाथरीकर, अशोक पाटील, अहमदभाई चाऊस, मोहनराव बडधे, कॉ.बाबा आरगडे, गोरक्षनाथ कापसे, आप्पासाहेब वाबळे, सावंत, भारत आरगडे आदी उपस्थित होते.

डॉ.कापसे म्हणाले, आंब्यासाठी भारी, हलकी, मुरमाड जमीन चालते. मुरमाड जमिनीत लागवड करताना काळ्या मातीने 50 टक्के तर भारी जमिनीत 50 टक्के मुरुमाने खड्डे भरून घ्यावेत. जमिनीत 10 टक्केपेक्षा जास्त चुनखडी, 8.2 पेक्षा जास्त सामू असू नये. लागवडीसाठी कलम केलेले निरोगी दीडफूट उंचीची रोपे वापरावीत. दीड बाय चार मीटर अंतरावर उत्तर-दक्षिण लागवड करावी. हवेचा झोत आणि बागेचे तपमान नियंत्रणासाठी शेताच्या चारही बाजूने हिरव्या झाडांची ताटी करावी. ठिबकद्वारे खते व पाणी द्यावे.

आंब्याची एकरी 666 झाडे बसतात. एक एकरासाठी 14 ते 15 लाख लिटर पाणी लागते.लागवडीनंतर तिसर्‍या वर्षी एकरी 2 टन पहिले उत्पन्न मिळते. तर चौथ्या वर्षांपासून एकरी 6 टन आंब्यातून 4 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. निर्यातीसाठी आंबा उतरविणे, पिकविणे व बाजार पेठेत वेळेत पोहोचविण्याचेही नियोजन केले पाहिजे. महाकेशर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष अंकुशराव कानडे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या