Wednesday, April 24, 2024
Homeनगरवारकरी संप्रदाय हा मानवता धर्म शिकविणारा - माजी मंत्री थोरात

वारकरी संप्रदाय हा मानवता धर्म शिकविणारा – माजी मंत्री थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून विविध संतांची मोठी परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाने भेदभावाला थारा न देता मानवता धर्म वाढीची शिकवण दिली आहे.हीच परंपरा गंगागिरी महाराज सप्ताहातून जपली जात असल्याने लाखो भाविकांचा हा अखंड हरिनाम सप्ताह श्रद्धास्थान असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

- Advertisement -

श्रीक्षेत्र कोकमठाण येथे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहात सातव्या दिवशी सरला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचन सेवा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, विवेक कोल्हे, सौ. स्नेहलता कोल्हे, नवनाथ महाराज आंधळे, आकाश नागरे, तुषार पोटे, सुभाष सांगळे, सचिन दिघे, सचिन खेमनर, विठ्ठलदास असावा, विक्रम दंडवते, मधु महाराज आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, वारकरी संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, संत गोरा कुंभार अशी विविध संतांची मांदियाळी या संप्रदायात आहे. वारकरी संप्रदाय हा साधा भोळा धर्म आहे. कपाळी बुक्का आणि हरी नामाचा जागर हा सोपा अध्यात्माचा मंत्र या पंथामध्ये आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या संप्रदायाने मानवतेचा धर्म शिकवला आहे. या पंथामध्ये लहान मोठा असा कोणताही भेद नसतो. या व्यासपीठावर सर्वजण एकत्र येतात. राजकारण बाजूला ठेवून सर्व एकत्र असतात किंबहुना अंत:करण शुद्ध करण्याचे हे व्यासपीठ आहे. शेकडो वर्षांच्या वारकरी संप्रदायाच्या मंथनाचा सार हरिभक्त परायण महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचनातून लाखो भावी भक्तांना मिळत असतो.

मानवता सेवा हाच खरा धर्म असून हाच विचार या संप्रदायाने दिला आहे. महंत गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज यांचा समर्थ वारसा परमपूज्य रामगिरी महाराज पुढे चालवत आहेत. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान हा सप्ताह ठरला आहे. येथील आमटी आणि भाकरी हा प्रसाद तर महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकासाठी मोठी अनुभूती आहे.

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज यांचे हरी प्रवचन झाले. यावेळी लाखो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित होता.

थोरात कारखान्याची मदत

आमदार बाळासाहेब थोरात यांची सराला बेट आणि या सप्ताहावर नितांत श्रद्धा असून दरवर्षी या सप्ताहात अमृत उद्योग समूह व थोरात कारखान्याची मोठी मदत असते. यावर्षीही चिवड्यासाठीचा महाप्रसाद, आमटी बनवण्याचे यंत्र, बुंदी सुकवण्याची यंत्रणा अशी मदत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने पुरवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या