Friday, April 26, 2024
Homeनगरसदगुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास श्रीश्रेत्र कोकमठाण येथे प्रारंभ

सदगुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास श्रीश्रेत्र कोकमठाण येथे प्रारंभ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

कोपरगाव तालुक्यातील श्रीश्रेत्र कोकमठाण येथे योगिराज गंगागिरी महाराज 175 वा अखंड हरिनाम सप्ताहास आज मंगळवार दि. 2 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. महंत रामगिरी महाराज यांची पुणतांबा चौफुली ते सप्ताह स्थळ अशी सकाळी 10 वाजता भव्य रथातून मिरवणूक काढत येणार आहे.

- Advertisement -

यावेळी घोडे, उंट, विविध वाद्य, झांजपथक, ढोलपथक आदी सर्वच वाद्य, भजनी मंडळ तसेच भक्त मंडळातील 4 ते 5 हजार महिला कलश घेवून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. एक ते दिड तास ही मिरवणूक चालणार आहे. सप्ताहस्थळी मिरवणूक आल्यानंतर प्रहरा मंडपात रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड भजनास प्रारंभ होईल. तेथेच महाराज उपस्थितीत भाविकांना उपदेशही करतील. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नगर-मनमाड हायवेलगत पूर्व बाजूला जंगली महाराज आश्रमानजिक 180 एकर क्षेत्रात हा सप्ताह होत आहे.

यासाठी शेतकर्‍यांनी 130 एकरात कोणतेही पिक न घेता सप्ताहासाठी राखीव ठेवली आहे. तसेच शेजारील शेती महामंडळाचे 50 एकर क्षेत्रही या सप्ताहासाठी देण्यात आले आहे. अशा एकूण 180 एकर क्षेत्रावर आजपासून लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिपंढरपूर अवतरणार आहे. 180 बाय 300 फुट आकाराचा प्रहरा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात 15 हजार टाळकरी एकावेळी भजनासाठी उभे राहु शकतील. सलग 168 तास अखंड भजन चालणार आहे. प्रहरा मंडपासमोरच महंत रामगिरी महाराज यांची कुटिया उभारण्यात आली आहे. याशिवाय भटारखान्याचे शेड काही अंतरावर 100 बाय 200 या आकारात उभारण्यात येत आहे.

प्रहरा मंडपाच्या पूर्व बाजूला विस्तीर्ण परिसरात किर्तन व प्रवचनासाठी 8040 फुट आकाराचे स्टेज उभारण्यात येत आहे. त्या समोर 10 ते 12 लाख भाविक बस शकतील. शिर्डीकडून येणार्‍या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी रोड लगत 10 एकरचे पार्किंग मैदान राखीव करण्यात आले आहे. कोपरगावकडून येणार्‍या भाविकांसाठी 20 एकर पार्किंग मैदान राखीव करण्यात आले आहे. सप्ताह ऐन पावसाळ्यात असतो. त्यामुळे भाविकांची पंगतीला अडचणी येते. म्हणून सप्ताह समितीने 100200 आकाराचे दोन स्वतंत्र पंगतीसाठी शामियाने उभारण्यात आले आहेत. हे दोन्ही मंडप पहिल्यांदाच भाविकांसाठीच्या पंगतीसाठी उभारण्यात आले आहेत.

आज पुरणपोळ्या अन् मांडे

आज नागपंचमी असल्याने सप्ताह पंचमीलाच उभा राहत असल्याने उपस्थितीत भाविकांसाठी खास मांडे, पुरण पोळ्यांची महाप्रसाद देण्यात येणार आहे. यासाठी येवला, नांदगाव येथील भाविक तसेच कोकमठाण पंचक्रोशी तसेच अन्य गावांमधून पोळ्या पंगतीसाठी देण्यात येणार आहेत. गोदावरी दूध संघाच्यावतीने यासाठी दुधाचा पुरवठा करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या