Friday, April 26, 2024
Homeनगरसडे शिवारात विजेचा खेळखंडोबा

सडे शिवारात विजेचा खेळखंडोबा

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri

राहुरी तालुक्यातील सडे शिवारातील पूर्वभागाच्या सडे कुक्कडवेढे शिवालगत विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. अत्यंत कमीदाबाने वीजपुरवठा येथील ट्रान्सफार्मरमधून होत असल्याने शेतकर्‍यांचे वीज पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत.

- Advertisement -

सडे शिवारातील पूर्व भागात वारंवार वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरातील टीव्ही, फॅन, फ्रिज आदी साधने वारंवार ठप्प झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून शेतकर्‍यांना एकर क्षेत्र भरण्यासाठी तब्बल चार पाच दिवसाचा कालावधी लागून सुद्धा शेतकर्‍यांचे भरणे होत नाहीत. अशा येथील शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. या भागातील कालव्याला मुबलक पाणी असताना देखील विजेअभावी दयनीय अवस्था येथील शेतकर्‍यांची झाली आहे.

तुटपुंज्या विजे अभावी शेतकर्‍यांच्या मोटारी चालत नसल्यामुळे येथील शेतकर्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागातील धोंडे वस्ती, पानसरे वस्ती, चोथे वस्ती येथे दैनंदिन वीज टिकत नसल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची उभी पिके जळू लागली आहेत. त्यामुळे येथील शेतकर्‍यांनी नवीन ट्रान्सफार्मर मिळणे कामी महावितरणकडे गेली दोन ते तीनवेळा लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु महावितरणने अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे सडे शिवारातील पूर्वभागातील शेतकर्‍यांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नवीन ट्रान्सफार्मर परिसरात तातडीने बसवावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या