Friday, April 26, 2024
Homeनगरघोकंपट्टीमधून शिक्षणाची सोडवणूक करणे आवश्यक - सचिन जोशी

घोकंपट्टीमधून शिक्षणाची सोडवणूक करणे आवश्यक – सचिन जोशी

अकोले |प्रतिनिधी| Akole

मुलांच्या मनात नवीन गोष्टी समजून उमजून घेण्याची उत्सुकता निर्माण करून त्यांना प्रश्न विचारायला उद्युक्त करणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकं आणि घोकंपट्टीमधून शिक्षणाची सोडवणूक करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्याचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या पद्धती यात कालसुसंगत बदल केले पाहिजेत, असे मत शिक्षण अभ्यासक सचिन उषाविलास जोशी यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

शाळेच्या विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल देवठाण बीटमधील एकूण 48 पैकी चार शाळा व्यवस्थापन समित्यांना कृतिशील शाळा व्यवस्थापन समिती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाळेत मनोभावे काम करणार्‍या मात्र कोणताही पुरस्कार न मिळालेल्या आठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी जोशी बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

गट शिक्षण अधिकारी सुभाष पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके, विस्तार अधिकारी अरविंद कुमावत, बबन निघते, सरपंच भारती शेळके, बाबासाहेब वाकचौरे, पत्रकार ज्ञानेश्वर खुळे, अंकुश थोरात, भीमाशंकर मालुंजकर, केंद्रप्रमुख सर्वश्री एकनाथ पाटेकर, मेंगाळ, कोरडे आणि कोळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चिकित्सक विचार, सहजीवन, सृजनशीलता, संवाद या जीवन कौशल्यांच्या विकासावर भर देण्याची गरज आहे, असेही जोशी यांनी सांगितले.

शाळा व्यवस्थापन समित्यांचा सन्मान करण्याची कल्पना विशेष असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांत दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे शाळांचा पट वाढत आहे असे त्यांनी सांगितले. या समारंभाचे वैशिष्टय म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांना पारितोषिके दिली जातात. मात्र आज पालकांच्या योगदानाचाही यथोचित सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समित्यांना पुरस्कार देऊन देवठाण बीटने नवीन पायंडा पाडला असून नवीन संकल्पना समोर ठेवली आहे. यातून व्यवस्थापन समित्यांमध्ये सकारात्मक चुरस निर्माण होऊन शाळांचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो.

विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अण्णा आभाळे, राजकमल नवले, संजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब चासकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बाळासाहेब शेळके यांनी स्वागत केले. अरुण शेळके यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या