Saturday, April 27, 2024
Homeनगरएसटीचा थांबा असताना बसेस थांबत नाहीत

एसटीचा थांबा असताना बसेस थांबत नाहीत

भोकर |वार्ताहर| Bhokar

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस थांबावी म्हणून अनेक ठिकाणी प्राधान्याने थांबा दिलेला असतानाही त्याठिकाणी बसेस थांबविल्या जात नाहीत. एसटी महामंडळाने स्वयंघोषित वेळापत्रक केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेळेवर महाविद्यालयात पोहचता यावे, ग्रामीण विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षण मिळावे म्हणून संबंधित एस. टी. चालकांना तशा सूचना दिलेल्या असताना अनेक थांब्यावर एसटी थांबतच नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यात पाचेगाव, उंबरी, निंभेरे, पाथरे, कमालपूर, साकूर व खरशिंदे या गावात मुक्कामी बस आहेत. त्या बसेस सकाळीच संबंधित मुक्कामापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सेवा देण्यास सुरूवात करतात. तर दररोज सकाळी भेर्डापूर, खानापूर, नाऊर, गणेशनगर, चितळी आदी गावांना सकाळच्या बसेस पाठविल्या जातात. गंगापूर व औरंगाबाद डेपोतून येणार्‍या सर्व बसेसला भोकर व खोकर फाटा येथे विनंतीवरून थांबा दिलेला आहे. मात्र या बसेस वेळेवर डेपोत पोहचता याव्यात म्हणून अधिकृत थांबा असतानाही त्या बसेस थांबत नाहीत.

प्रत्यक्षात श्रीरामपूर तालुक्यातील अनेक खेडे गावात पहाटे श्रीरामपूर येथून सोडल्या जाणार्‍या किंवा रात्री डेपोच्या सोयीने सोडल्या जात असलेल्या बसेस बहुतांशी रिकाम्याच फेर्‍या मारत असल्याने कागदोपत्री प्रवाशी नसल्याचे कारण भविष्यात सांगितले जाऊ शकते तर दुसरीकडे केवळ कागदोपत्री मेळ घातला जात असल्याच्या प्रतिक्रीया अनेक चालकांकडून उमटत आहेत. याचाच अर्थ ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असलेल्या बसेस अवेळी सोडल्याने कागदोपत्री ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ दिसत असल्या तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे. अशीच काहीशी अवस्था महाविद्यालयातून घरी जाताना या विद्यार्थी व विद्यार्थ्यांची असल्याने त्या पस्थितीच्या वेळेचाही विचार होण्याची गरज आहे.

विद्यार्थी व विद्यार्थिनींना पास असून ही खाजगी वाहनांनी महाविद्यालयाच्या वेळेत पोहचण्यासाठीची धावपळ ही सुरूच राहणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना पासची सुविधा असताना त्यांना खासगी गाड्यांमध्ये खर्च करून जावे लागते. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची आर्थीक स्थिती हालाखीची आहे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे दुर्दैव पहायला मिळत आहे.

बस थांब्यावर बस चालकाने सूचना संबंधित चालकांना दिलेल्या असताना अशा थांब्यावर एसटी न थांबल्यास संबंधित एसटीचा क्रमांक व वेळेचा उल्लेख करून तात्काळ श्रीरामपूर डेपोत लेखी तक्रार करावी. संबंधित चालकांवर दंडात्मक करू तसेच प्रसंगी संबंधित डेपोकडे आपली तक्रार पाठवून कारवाई केली जाईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

– राकेश शिवदे डेपो व्यवस्थापक, श्रीरामपूर एसटी डेपो

- Advertisment -

ताज्या बातम्या