जळगाव विमानतळावर बॉम्बची अफवा

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – Jalgaon :

जळगाव विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती शनिवार, 26 डिसेंबर रोजी सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि एकच खळबळ उडाली.

ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा यांनी अलर्ट होत विमानतळ परिसराची कसून तपासणी केली. भारतीय विमान पत्तन प्राधिकरणातर्फे मात्र हे सुरक्षा यंत्रणांसाठी प्रात्याक्षिक असल्याचे समजल्यानंतर विमानतळ व्यवस्थेतील कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नागरी विमान मंत्रालयातर्फे राज्य पोलिसांकडुन मिळणार्या सहकार्य आणि प्रतिसादाची दरवर्षी तपासणी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय विमान प्राधिकरणातर्फे मॉकड्रील घेण्यात आले.

विमानतळाच्या प्रवेश कक्षात बॉम्ब

जळगाव विमानतळावरील कार्यालयात एका अनोळखी व्यक्तीने फोन करून विमानतळाच्या प्रवेश कक्षामध्ये एका सुटकेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले.

ही सूचना मिळताच एअरलाईन्सचे सुरक्षा व्यवस्थापक यांनी ताबडतोब सर्व प्रवाशी व कर्मचारी यांना इमारत रिकामी करण्याच्या सुचना दिल्या.

विमानतळ संचालकांच्या सूचनेनुसार एमएसएफ सुरक्षा अधिकारी यांनी तात्काळ ही बातमी सर्व सुरक्षा संबंधित यंत्रणांना दूरध्वनीद्वारे कळविली.

अवघ्या 15 मिनीटात यंत्रणा दाखल

जळगाव विमानतळावर सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच अवघ्या 15 ते 20 मिनीटात सर्व यंत्रणा विमानतळावर दाखल झाल्या.

पोलिस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकासह अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने बॉम्ब सदृश वस्तुचा शोध घेतला.

ही वस्तु बॉम्ब कुलिंग पीटमध्ये नेऊन तीचे निराकरण करण्यात आले. ही सर्व कवायत अवघ्या 35 मिनीटात पुर्ण झाली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली यंत्रणांची बैठक होऊन त्रृटीसंदर्भात सुचना आणि चर्चा करण्यात आली.

यांचा होता सहभाग

या सरावाचे संचलन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणपुरे, एमआयडीसीचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे, बॉम्ब शोधक पथक प्रमुख आर.डी.मोरे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुमित तिवारी, पोलिस निरीक्षक राहुल मगर, नीलेश वाटपाड, श्री. बोरसे, दीपक चौधरी यांनी या मॉकड्रील सहभाग घेतला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *