Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगररुईत 17 आदिवासी कुटुंबांच्या घरात पाणी

रुईत 17 आदिवासी कुटुंबांच्या घरात पाणी

सावळीविहीर |वार्ताहर| Savalivihir

राहाता तालुक्यातील रुई येथील सुमारे सतरा आदिवासी कुटुंबांना अतिपर्जन्यवृष्टीचा फटका बसला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ग्रामपंचायत मंगल कार्यालयातील इमारतीत हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

रुई गावठाण हद्दीतील सेवा सहकारी सोसायटीच्या मागील बाजुला सदर आदिवासी कुटुंब गेल्या 25 वर्षांपासून वास्तव्यास आहे. तेथे ते झोपड्या करून राहतात व स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतात मजुरी करत आहेत.

दरवर्षी जास्त पाऊस झाल्यानंतर त्यांच्या घरात पाणी जाणार हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या आदिवासींचा पावसाळ्यात ग्रामपंचायतीच्या मंगल कार्यालयात मुक्काम हे नित्याचेच झाले आहे. दरवर्षी येणार्‍या संकटातून मुक्त करावे, अशी मागणी छाया भाऊसाहेब भवर, बापू जालिंदर माळी, शोभा मोहन पवार यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीने सुविधा पुरवाव्यात – माया माळी

आमचे सर्व संसार पाण्यात बुडाले आहेत. धान्य पाण्यात भिजले अंगावरच्या कपड्यावर आम्ही लहान मुलं घेऊन बाहेर पडलो. ग्रामपंचायतीने मंगल कार्यालय उघडून दिले तर तिथे चूल पेटवू नका तरच रहा असे सांगितले. हाताला काम नाही तर गॅस कुठून भरून आणायचा. त्यामुळे आम्हाला सर्व सुविधा शासनाने पुरवाव्यात, असे येथील पूरबाधित माया बापू माळी म्हणाल्या.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष – श्रावण माळी

या आदिवासींना सुविधा देण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून हे लोक रुईचे मतदार आहेत. त्यांना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देत नाही, मागील वेळी तर मंगल कार्यालय बळकावतील म्हणून पोलीस बोलावले. ना. राधाकृष्ण विखे यांच्या मतदार संघात आदिवासींना अशी वागणूक मिळत असेल तर काय उपयोग आहे, असे सामाजिक कार्यकर्ते श्रावण माळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या