Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरुद्रम : युद्ध मैदानातील अजेय योद्धा

रुद्रम : युद्ध मैदानातील अजेय योद्धा

प्रा. विजया पंडित

अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी हनुमानउडी घेतली असून, ‘रुद्रम’ क्षेपणास्त्राच्या मदतीने शत्रूची रडार प्रणाली आणि कम्युनिकेशन सिस्टिम उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारतीय वायुदलाला प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

अनेक वैशिष्ट्यांनी युक्त रुद्रम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. युद्धाच्या पहिल्याच टप्प्यात अशा प्रकारची क्षेपणास्त्रे वापरण्याची रणनीती आता जगातील सर्वच देश स्वीकारत असल्यामुळे रुद्रमच्या यशस्वी चाचणीस विशेष महत्त्व आहे.

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत भारताचा संघर्ष सुरू असतानाच स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या एका पाठोपाठ एक चाचण्या करून भारत आपल्या क्षेपणास्त्रशक्तीचा स्पष्ट अंदाज जगाला देत आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने नुकतीच आणखी एक हनुमानउडी घेतली आहे. विशेषतः भारतीय वायुसेनेसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘रुद्रम’ हे किरणोत्सर्गरोधी म्हणजे अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 9 ऑक्टोबर रोजी उडिशामधील बालासोर येथे इंटिग्रेटेड टेस्टिंग रेंजमध्ये (आयटीआर) घेण्यात आली आणि एक नवा इतिहास रचला गेला. हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या शास्त्रज्ञांकडून सुखोई एसयू-30 एमकेआय फायटर जेटच्या माध्यमातून डागण्यात आले आणि ‘रुद्रम’ने आपले लक्ष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले. हे देशातच तयार झालेले नव्या पिढीतील पहिले अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. त्याचा पल्ला 100 ते 250 किलोमीटर यादरम्यान आहे.

हवेतून जमिनीवर मारा करणारे हे पहिले असे क्षेपणास्त्र आहे, ज्याच्या साह्याने शत्रूच्या लक्ष्यावर क्षणार्धात प्रहार करता येतो आणि पापणी लवण्याच्या आत ते उद्ध्वस्त करता येते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये या क्षेपणास्त्राचा पल्ला बदलता येतो. या क्षेपणास्त्राच्या साह्याने शत्रूचे सर्व्हिलान्स रडार, ट्रॅकिंग आणि कम्युनिकेशन सिस्टिम अशा लक्ष्यांवर अचूक प्रहार करता येतो. सध्या डीआरडीओकडून रुद्रमची चाचणी सुखोई एसयू-30 विमानाद्वारे घेण्यात आली आहे; परंतु ते पूर्णपणे विकसित झाल्यानंतर मिराज 2000, जगुआर, एचएएल तेजस तसेच एचएएल तेजस-मार्क 2 या विमानांमधूनही डागता येईल.

शत्रूचे रडार किंवा त्याच्या हवाई सुरक्षा प्रणालीच्या चिंधड्या उडविण्याची क्षमता हे रुद्रमचे मोठे वैशिष्ट्य आहे. आपले लक्ष्य शोधून काढण्यात रुद्रम पटाईत आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारला लक्ष्य करून ते उद्ध्वस्त करते आणि त्यामुळे शत्रूला या क्षेपणास्त्राचा माग काढणे शक्य होत नाही. लक्ष्य शोधून अचूक निशाणा साधण्यात रुद्रमला सक्षम करण्यासाठी त्यात एक रडार डोम असून, त्याच्या मदतीने जमिनीवर असलेल्या शत्रूच्या रडारला उद्ध्वस्त करता येते. रेडिओ सिग्नल तसेच रडारसोबत विमानात बसविण्यात आलेले रेडिओसुद्धा याच्या निशाण्यावर येऊ शकतात. याच कारणामुळे अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे हे क्षेपणास्त्र ‘युद्धाच्या मैदानातील अजेय योद्धा’ मानले जाते. भारतात तयार करण्यात आलेल्या या पहिल्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची गती मॅक-2 पासून मॅक-3 पर्यंत वाढवू शकता येते. म्हणजेच रुद्रम क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीपेक्षाही दुप्पट किंवा तिप्पट वेगाने आपल्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास करू शकते आणि ते उद्ध्वस्त करू शकते. कोणत्याही प्रकारचे सिग्नल किंवा रेडिएशन पकडून रडार नष्ट करण्यात हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. डी-जी बँडमध्ये नियंत्रित करण्यात येणारे या नव्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राचे मोठे वैशिष्ट्य असे की, रेडिओ फ्रिक्वेन्सी कुठून येत आहे, याचा शोध ते 100 किलोमीटर अंतरावरूनच लावू शकते.

अँटी रेडिएशन क्षेपणास्त्रे म्हणजे काय, हेही या निमित्ताने जाणून घेतले पाहिजे. ही अशा प्रकारची क्षेपणास्त्रे असतात, जी शत्रूच्या कम्युनिकेशन सिस्टिमवर म्हणजे दळणवळण यंत्रणेवर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठीच तयार केली जातात. या क्षेपणास्त्राला सेन्सर जोडलेले असतात आणि त्या माध्यमातून रेडिएशनचे स्रोत शोधून हे क्षेपणास्त्र लक्ष्याच्या जवळ जाते आणि त्यानंतर ते फुटते. शत्रूचे रडार, जॅमर्स आणि बातचीत करण्यासाठी वापरण्यात येणार्या रेडिओला भेदण्यासाठीही वापरता येते. अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर कोणत्याही युद्धाच्या पहिल्या टप्प्यात केला जातो. याखेरीज ही क्षेपणास्त्रे जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठीही वापरता येतात.

रुद्रमची लांबी साडेपाच मीटर आणि वजन 140 किलोग्रॅम आहे. तसेच त्यात सॉलिट रॉकेट मोटर बसविण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र 100 ते 250 किलोमीटरच्या पल्ल्यातील कोणतेही लक्ष्य भेदू शकते. हे विमानात तैनात करण्यात येणारे पहिले स्वदेशी क्षेपणास्त्र असून, कितीही उंचीवरून ते डागता येते. पाचशे मीटरपासून पंधरा किलोमीटरपर्यंत कितीही उंचीवरून हे क्षेपणास्त्र लाँच करता येते आणि त्याचा प्रचंड वेगच त्याला मैदानातील अजेय योद्धा बनविणारा ठरतो. ज्यातून रेडिएशन निघतात अशी 250 किलोमीटरच्या पल्ल्यातील कोणतीही वस्तू बरबाद करणारे हे क्षेपणास्त्र आहे. अंतिम हल्ल्यासाठी आयएनएस-जीपीएस नेव्हिगेशनच्या सोबत प्रायमरी गायडन्स सिस्टिम म्हणून वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीवरील लक्ष्यांची ओळख पटवून त्यांचे वर्गीकरण करून निशाणा साधण्यासाठी उपयोगात आणले जाणारे पॅसिव्ह होमिंग हेडसुद्धा (पीएचएच) या क्षेपणास्त्रात बसविण्यात आले आहे. ब्रॉडबँड क्षमतेने युक्त पीएचएस उपकरणामुळे क्षेपणास्त्राला एमिटर्समधून आपले लक्ष्य निवडण्याची क्षमता प्राप्त होते. रुद्रमचा वापर भारतीय वायुसेनेकडून एअर डिफेन्स सिस्टिमच्या व्यतिरिक्त अशी रडार उद्ध्वस्त करण्यासाठीही केला जाईल, जी डिटेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वतःला शटडाऊन करतात. निष्क्रिय होमिंग हेडने युक्त रुद्रम रेडिएशनच्या अनेक प्रकारच्या स्रोतांचा छडा लावल्यानंतर ते लॉक करून टाकते. अशी क्षेपणास्त्रे लाँच झाल्यानंतर जर शत्रूने आपले रडार बंद केले तरीसुद्धा शत्रूचे ते रडार रुद्रमच्या निशाण्यावर असू शकते. रुद्रम लाँच केल्यानंतरसुद्धा त्याला एखाद्या लक्ष्यासाठी लॉक करता येऊ शकते.

संरक्षण शक्ती वाढविण्याच्या दिशेने रुद्रम हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, कारण जगातल्या अनेक प्रमुख देशांकडून आता अशा प्रकारची क्षेपणास्त्रे विकसित केली जात आहेत, जी युद्धाच्या पहिल्या टप्प्यातच शत्रूची सिग्नल आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त करू शकतील. रुद्रम या कसोटीवर पूर्णपणे यशस्वी ठरले आहे. संरक्षणविषयक तज्ज्ञांच्या मते, रुद्रमच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेजवळ अशी शक्ती आली आहे, ज्याद्वारे शत्रूच्या हद्दीत घुसून त्याची वायुशक्ती उद्ध्वस्त करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर क्षेपणास्त्राच्या मदतीने भारतीय वायुसेनेला कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपल्या मोहिमा पूर्ण करण्यातही यश मिळेल. भारताच्या दृष्टीने सद्यःस्थितीत रुद्रमसारखी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्रे अत्यंत गरजेची आहेत. कारण शेजारील शत्रुराष्ट्रे आपापल्या सीमांवर रडार आणि देखरेख तंत्र विकसित करून भारतापुढे सातत्याने आव्हान निर्माण करीत आहेत. अशा स्थितीत रुद्रमसारखे उच्च तंत्रज्ञानयुक्त अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र विकसित करणे काळाची गरज होती आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक मेहनतीच्या माध्यमातून असे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश आले, ही आपल्या द़ृष्टीने अभिमानास्पद बाब होय. शत्रुराष्ट्राची विमानभेदी यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची क्षमता रुद्रमच्या रूपाने भारतीय वायुसेनेची शक्ती वाढविणारी ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या