Friday, April 26, 2024
Homeनगरआरटीई लॉटरी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 31 तारखेची डेडलाईन

आरटीई लॉटरी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 31 तारखेची डेडलाईन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. त्यानुसार 17 मार्च रोजी सोडत काढण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा अशा सूचना शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व मनपा प्रशासन अधिकारी यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

करोना विषाणूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांना गर्दी करु नये. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे. त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रति घेऊन ज्या शाळेत लॉटरी लागली आहे. त्या शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई-मेल द्वारे, कागदपत्रे शाळेत पाठवून दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी.

सद्यस्थितीच्या ऑनलाईन अहवालानुसार नगर जिल्ह्यामध्ये 3 हजार 382 विद्यार्थ्यांच्या निवडी झालेल्या आहेत. त्यापैकी शाळा स्तरावर 1 हजार 966 विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. तालुकास्तरावर 1 हजार 902 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. एकूण 1 हजार 454 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे बाकी आहेत.

जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा 25 टक्के प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत, प्रवेश देण्यास विलंब करत आहेत. याबाबत जिल्हा स्तरावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन लॉटरीअंतर्गत यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे संबंधित शाळेत प्रवेश होतील, याची दक्षता घ्यावी. संबंधित शाळांशी संपर्क करून विहित मुदतीत कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ज्या शाळा प्रतिसाद देणार नाहीत, अशा शाळांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी, त्या कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करावा. सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, असे नियोजन करावे. अन्यथा त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. कार्यवाहीचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा, असेही शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या