आरटीई : मोफत प्रवेशाच्या 833 जागा रिक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar – बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा (आरटीई) अंतर्गत 25 टक्के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया 11 जूनपासून जिल्ह्यात झालेली आहे. जिल्ह्यात 402 शाळांसाठी 4825 अर्ज आले होते. त्यातून पहिल्या टप्प्यात लॉटरी पद्धतीने 2753 अर्ज अंतिम झाले. त्यापैकी आतापर्यंत 1920 प्रवेश झाले आहेत. अजूनही 833 प्रवेश होणे बाकी आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये किमान 25 टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. निकषात बसणार्‍या नजीकच्या शाळेमध्ये या प्रक्रियेतून पूर्व प्राथमिक व पहिलीसाठी प्रवेश दिले जातात. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळा मोफत शिक्षण देते.

त्या बदल्यात शासन संबंधित शाळेला प्रतिपूर्ती रक्कम अदा करते. जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी 21 जानेवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीमध्ये शाळांनी नोंदणी होऊन त्यात 402 शाळा पात्र ठरल्या. या नोंदणी केलेल्या शाळांमध्ये पालकांनी 3 मार्च ते 21 मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज भरले.

नगर जिल्ह्यात एकूण 402 शाळांमध्ये 3013 जागांसाठी 4825 अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची राज्यस्तरावरून 7 एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीमध्ये 2753 अर्जांची निवड झाली. निवड झालेल्या अर्जांसाठी 11 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या महिनाभरात 1920 प्रवेश झाले आहेत. अजूनही 833 प्रवेश होणे बाकी आहे. प्रवेश मुदतीत न झाल्याने आता शासनाने प्रवेशासाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *