Friday, April 26, 2024
Homeनगरवित्त आयोगाचा निधी लोकोपयोगी कामांसाठी उपयोगात आणावा

वित्त आयोगाचा निधी लोकोपयोगी कामांसाठी उपयोगात आणावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पर्यटनाच्यादृष्टीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर शहर आणि जिल्ह्याला विकासासाठी मोठा वाव आहे.

- Advertisement -

एकत्रितपणे काम केल्यास 2-3 वर्षांत हे शहर आणि जिल्हा देशात क्रमांक एकचा बनेल. त्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 15 व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींसाठी मिळणारा निधी सरपंच आणि ग्रामसेवक तसेच सदस्यांनी गावविकासासाठी नाविन्यपूर्ण आणि लोकोपयोगी कामांसाठी उपयोगात आणावा. या निधीवरून सरपंच आणि सदस्य यांच्या वाद होऊ नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम योजने अंतर्गत यशस्वी ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती मीरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, सुनील गडाख, जिल्ह्यातील विविध पंचायत समिती सभापती क्षितीज घुले, बाळासाहेब लटके, उर्मिला राऊत आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. अतिशय कष्टातून स्वत:चे नेतृत्व तयार करणार्‍या आबांनी पारदर्शकपणे कारभार केला. गावविकासासाठी असणार्‍या त्यांच्या तळमळीने विविध योजना आकाराला आल्या आणि त्यातून हजारो गावांचा कायापालट झाला. त्यामुळेच सुंदर गाव योजनांचे पुरस्कार त्यांच्या नावाने आणि त्यांच्या स्मृतिदिनी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, असे त्यांनी सांगितले. गावविकासासाठी आता ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून मोठा निधी मिळत आहे.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसेच इतर विकासकामांसाठी हा निधी आहे. त्याचा योग्य विनियोग करून विकास साधावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने त्यांच्या गावात प्राथमिक शाळेसाठी चांगली इमारत, अंगणवाडीसाठी इमारत आणि स्मशानभूमी असेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. या बाबींच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्षा घुले यांनी, ग्रामविकास क्षेत्रात गावपातळीवर विविध विकास कामे होत असल्याचे सांगितले. पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडेच ग्रामविकास विभाग असल्याने ग्रामीण भागातील अडचणी दूर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हास्तरावर सहा ग्रामपंचायती आणि 14 तालुक्यांतून एक अशा 14 ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी माऊली संकुलात मोठी गर्दी झाली होती. याठिकाणी मोठ्या संख्येने पुरस्कार स्विकारण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा झगमगट मोठा होता, याठिकाणी आलेल्या साध्या पाण्याची व्यवस्था संयोजकांच्यावतीने करण्यात आली नव्हती. कार्यक्रम संपल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. सभागृहात उपस्थित असणार्‍यांना संयोजकांनी किमान पाणी पाजणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या