Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरीत रिपाइं, वंचित आघाडी व भारीप बहुजनचा बंदला विरोध

राहुरीत रिपाइं, वंचित आघाडी व भारीप बहुजनचा बंदला विरोध

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने दि. 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

- Advertisement -

या लॉकडाऊनला छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. आम्ही दुकाने बंद ठेवणार नाही. अशी भूमिका त्यांनी मांडत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, गेल्या पाच महिन्यापासून करोनाच्या भयंकर महामारीमुळे भारतातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तीच परिस्थिती आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात आहे.

लॉकडाऊनमुळे राहुरी तालुक्यातील छोटे छोटे व्यावसायिक, रिक्षावाले, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते इतर व्यवसायिक यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. म्हणून आरपीआय आठवले गट, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, फळविक्रेते संघटना, रिक्षा चालक संघटना, भाजीपाला विक्रेते, राहुरी शहरातील छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार, बिगारी, मजूर, घर कामगार महिला, व्यापारी कामगार संघटना यांच्या वतीने राहुरी तालुक्यात किंवा शहरात पुन्हा लॉकडाऊन करू नये, अशी मागणी निवेदनात केली आहे.

आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांनी सांगितले, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून परिस्थिती खूप वाईट आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब जनतेला कामधंदा नाही, रोजगार नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन करणे चुकीचे आहे.

राहुरी येथील व्यापारी असोसिएशन ने छोटे व्यापारी, हातगाडी व्यापारी यांना विचारात घेतले नाही. हातावर पोट भरणार्‍या लोकांचा विचार केला नाही. ग्रामीण भागातील व्यापार्‍यांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आम्ही लॉकडाऊनला विरोध करीत आहोत. ज्या व्यापा-यांना दुकाने बंद ठेवायची आहेत, त्यांनी बंद ठेवावी. ज्यांना दुकाने सुरू ठेवायची, त्यांनी सुरू ठेवावी, असे आवाहन विलास साळवे यांनी केले.

सुरेंद्र थोरात यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली. तेव्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन जाहीर केले नाही. स्थानिक नागरिकांनी काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वेळेत दुकाने चालू राहिली तर आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. असे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी सांगितले.

निवेदनावर आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, वंचित बहुजन आघाडीचे पिंटू साळवे, भारीपचे बाबासाहेब साठे, अनिल जाधव, नबीभाई शेख, बॉबी साळवे, कल्याण जगधने, देवदान गायकवाड, अरूण पवार, मोहम्मद ईराणी, मकबूल इनामदार, सचिन साळवे, गणेश पवार, बाबासाहेब मकासरे, संदिप गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या