कडवासह भोजापूरमधून रब्बीसाठी आवर्तन

jalgaon-digital
1 Min Read

सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

तालुक्यातील पुर्व भागाची जलवाहीनी असलेल्या कडवा आणि भोजापूर या दोन्ही कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले असून त्यामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह पाणीपुरवठा योजनांना लाभ होणार आहे.

रब्बी पिकांसाठी कडवा कालव्याला सोमवारी (दि. 8) दुसरे आवर्तन सोडण्यात आले. 1 हजार 400 हेक्टरवरील सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी दोन तलाव भरण्यात येणार आहेत. पाण्याची चोरी थांबवण्यासाठी शिंदे येथून शेवटच्या टोकापर्यंत डोंगळे शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सहाय्यक कार्यकारी अभियंता संतोष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली आवर्तनाचे नियोजन आखण्यात आले आहे.

सोमवारी दु. 12 वाजता 250 क्युसेक क्षमतेने कालव्याला पाणी सोडण्यात आले. कालव्याच्या टोकाकडील पुतळेवाडी पासून पाणी वितरणाला सुरुवात करण्यात येणार असून लाभक्षेत्रातील गहू, हरभरा, फळबागा, मका आदी. पिकांना लाभ होणार आहे. या आवर्तनातून वडांगळी पाणी पुरवठा योजनेचा साठवण तलाव तसेच पांगरी पाणीपुरवठा योजनेसाठी डांबरनाला बंधार्‍यात पाणी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, भोजापूर कालव्याला 20 दिवसाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून सोमवारी सोडलेल्या आवर्तनातून 900 हेक्टरवरील सिंचनाला लाभ होणार आहे. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील 22 हून अधिक गावांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे. हे आवर्तन किमान वीस दिवस सुरू राहणार आहे. 200 दशलक्ष घनफूट पाण्याद्वारे 900 हेक्टरवरील रब्बी पिकांना आवर्तनाचा लाभ होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *