Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयपवार - पडळकरांमध्ये मिरजगाव रस्त्यावरून रंगली जुगलबंदी

पवार – पडळकरांमध्ये मिरजगाव रस्त्यावरून रंगली जुगलबंदी

अहमदनगर/मिरजगाव |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर आणि कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांच्यात शनिवारी चांगली जुगलबंदी रंगली.

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील मिरजगाव रोडवरील खड्ड्यावरून भाजप नेते आ. पडळकर यांनी आ. रोहित पवार यांना लक्ष्य केले. आ. पडळकर यांच्या टिकेला उत्तर देताना आ. पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघ हा गेली 25 वर्षे भाजपच्या ताब्यात होता.

तेव्हा या मतदारसंघात काय विकास कामे झाली याचा शोध घ्यावा, असे आव्हान दिले. तर भाजप नेते आ. पडळकर कुणाच्या कडेवर आहात, असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.

भाजप नेते आणि विधान परिषदेचे आ. पडळकर यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते आणि खा. शरद पवार यांचे नातू आ. रोहित पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. औरंगाबादला जाताना, आ. पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यावर उतरून पडळकर यांनी आ. पवारांवर निशाणा साधला.

रोहित पवार हे नेहमीच ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात. आपण खूप मोठे नेते झालो आहोत, या अविर्भावात ते असतात.

मात्र, शरद पवार यांच्या खांद्यावरून तुम्ही तुमची उंची मोजू नका. रोहित दादा, जरा पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, अशा शब्दांत आ. पडळकर यांनी आ. पवारांवर थेट कर्जत-जामखेड मतदारसंघातून टीका केली.

त्यावर आ. पवार यांनी त्याला उत्तर देताना माझे मित्र आ.पडळकरजींनी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वत:हून या विषयाला हात घातलात. यामुळे तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल.

माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली 25 वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळे इथे 25 वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झाले नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरून काढण्यासाठी काम करतोय आणि करोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे म्हणत खराब रस्त्याचं खापर भाजपा नेत्यांवरच फोडले आहे.

25 वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळे त्यांना जाब विचारणार नाहीत.

आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मीडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय, ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे.

हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच, असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मी हवेतून पाणी काढणारा नेता नाही : पवार

कर्जत-जामखेड या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका, असे म्हणत आ. पवारांनी भाजपने नेते आ. पडळकरांना चिमटा काढला.

- Advertisment -

ताज्या बातम्या