Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘रस्ता बंद‘चा फलक

‘रस्ता बंद‘चा फलक

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंद करण्याच्या सूचना फलकामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसराबरोबरच नानेगावला जाणारा रस्ताही बंद होण्याची शक्यता असल्याने रस्त्याबाबत नगरसेविका मीना करंजकरांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

विजयनगरमधील अमित सोसायटीसह परिसरातील नागरिकांचा जुना वापराचा रस्ता अचानकपणे लष्कराकडून बंद करण्याच्या सूचना फलकांमुळे स्वत:च्या घरी कोणत्या मार्गाने ये-जा करायची, असा प्रश्न निर्माण होणार आहे. नागरी व लष्करी हद्द शेजारी असल्याने वाहतूक बंदबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

लष्कराच्या जागेतून जाणार्‍या रस्त्याचा आधार घेत एक हजारापेक्षा जास्त कुटुंबांची बिनशेती प्लॉटमध्ये नागरिक राहतात. ज्या रस्त्याच्या आधारे छावणी परिषदेने घरांचा आराखडा मंजूर केला, त्याच रस्त्याचा वापर 31 ऑक्टोबरपासून बंद करण्याची सूचना देताना सदर जागा संरक्षण विभागाची आहे, असे फलकावर लिहून याबाबत छावणी परिषद कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भगूर-नानेगाव रस्त्याबाबत लष्कर व ग्रामस्थांमध्ये अनेकदा पत्रव्यवहार होऊन 20 मीटर अंतराचा रस्ता ठेवण्याचा निर्णय होऊन लष्कराकडून रस्ता बंदबाबत फलक लावल्याने विद्यार्थी, कामगारांसह, शेतकरी, नागरिकांना भगूर-देवळाली कॅम्पला येण्यासाठी दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.

देवळाली छावणी परिषदेने विजयनगरच्या विमानतळालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या वहिवाटीच्या रस्त्याच्या आधारेच कुटुंबांच्या घरांना परवानगी दिली आहे. सदर रस्ता बंद करू नये, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांबरोबर उपोषण करणार असल्याचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर व नगरसेविका मीना करंजकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या