Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद

श्रीगोंदा : रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद

श्रीगोंदा | प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे ट्रक लुटून त्यामधील 25 क्विंटल मका चोरणार्‍या टोळीतील चारजणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 25 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपास करून अवघ्या तीन दिवसांत ही कारवाई केली.

- Advertisement -

कन्नोज (उत्तर प्रदेश) येथून 30 टन मक्याची पोती भरून ट्रक (एमपी 09 एचएच 9532) सांगली येथे पोहोच करण्याकरिता जात असताना दि. 11 जुलै रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेटच्या पुढे ट्रक अज्ञात आरोपींनी अडवून ती बाबुर्डी शिवारातील वस्तीजवळ नेली. नंतर चौदा टायर ट्रकमध्ये सुमारे 25 टन मका बळजबरीने भरून घेऊन आरोपी पळून गेले. याप्रकरणी ट्रकचालक निलेश चतरसिंग लोदी (बधोरीया, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपास केला.

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील ट्रक काष्टी येथे मिळून आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आर्यन शंकर कांबळे (वय 24 वर्षे रा. सांगवी ता. फलटण जि. सातारा) संजय बबन कोळपे (वय 46 वर्षे, रा. बोरी, ता. श्रीगोंदे), गणेश श्रीमंत गिरी (25, रा. श्रीगोदे कारखाना), भाऊसाहेब गंगाराम पालवे (वय 21, रा. श्रीगोंदे कारखाना) व इतर एक यांनी केला असल्याचे उघड झाले. त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यात वापरलेला ट्रक (एमएच 16 सी सी 5982 2), 25 टन मका, दुचाकी (एमएच 14 सीव्ही 5430), तसेच ट्रक ड्रायव्हरचा चोरून नेलेला मोबाईल असा एकूण 25 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, पोसइ अमित माळी, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, अमोल कोतकर, वैभव गांगर्डे, प्रशांत राठोड यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोसई अमित माळी, पोकॉ वैभव गांगर्डे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या