Wednesday, April 24, 2024
Homeनगररस्त्याच्या प्रश्नासाठी चैतन्यपूर येथे आज रास्तारोको

रस्त्याच्या प्रश्नासाठी चैतन्यपूर येथे आज रास्तारोको

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताचीवाडी या रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

आज 15 मार्चला चैतन्यपूर येथे रज्ञस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

चैतन्यपूर ते भक्तांचीवाडी हा रस्ता गावातीलच काही शेतकर्‍यांकडून रस्त्यावर दगडगोटे, काटेरी झुडूपे आणून टाकून काठ्या लावून अडविण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक बंद झाली असून गावकर्‍यांना ये-जा करण्यास मनाई करण्यात येत आहे.

याबाबत चैतन्यपूर येथील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांसह महिलांनी शुक्रवारी (12 मार्च) अकोल्यात येऊन तहसीलदार कार्यालयावर धडक मूकमोर्चा नेला. तेथे तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन सादर केले.

या रस्त्याबाबत गावकरी सहा महिन्यांपासून तक्रारी करीत आहेत व तालुका प्रशासनाकडे दाद मागत आहेत, पण त्यांचा प्रश्न सोडविण्याबाबत तालुका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे

सहा महिन्यांपासून या भागातील दूध उत्पादकांचे दैनंदिन दूध संकलन, उत्पादित भाजीपाला, शेतमाल वाहतूक, परिसरातून विद्यार्थ्यांचा शाळेला जाण्याचा व शेतमजूर महिलांसह शेतकर्‍यांचा वाहतुकीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळेच या रस्त्याचा प्रश्न सुटण्यासाठी सोमवारी (15 मार्च) चैतन्यपूर फाटा येथे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.

चैतन्यपूर ते भक्ताचीवाडी हा रस्ता वाहतुकीस बंद केल्याने शुक्रवार ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. पण समाधान न झाल्याने त्यांनी माजी आमदार वैभव पिचड यांची भेट घेऊन अडचण दूर करण्याबाबत साकडे घातले.

जुलै 2019 मध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतून तयार केलेला चैतन्यपूर ते भक्ताचीवाडी ते बदगी रस्ता येथील एका शेतकर्‍याने अडवल्यामुळे अजूनही पूर्ण होऊ शकला नाही. यासंदर्भात अनेकदा तहसीलदार व संबंधित विभागाकडे वारंवार संपर्क व तक्रार करून निवेदन देऊन अद्यापपर्यंत काहीही उपयोग झाला नाही. याउलट रस्त्याचे सुरू काम बंद पडले.

हे प्रशासन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत चैतन्यपूर गावाशी भक्ताचीवाडी, टाकळी, पाटीलवाडा या तीनही वाड्यांचा रस्ता बंद केल्यामुळे संपर्क तुटलाय. संबंधित शेतकर्‍याने या रस्त्यावर मातीचे ढीग टाकून काठ्या लावून येणार्‍या जाणार्‍या विद्यार्थी, दूध उत्पादक, सायकल, दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना वाहतुकीस रस्ता पूर्णपणे बंद झाला.

त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली. शेतकर्‍यांना शेतमाल आणायला रस्ताच राहिला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून येथील नागरिक, विद्यार्थी व शेतकर्‍यांना हा रस्ता पूर्णपणे बंद केल्यामुळे सगळीच अडचण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या