Sunday, April 28, 2024
Homeनगररस्त्यातील खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी

रस्त्यातील खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी

आंबी |वार्ताहर| Ambi

राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावरील सरई परिसरात खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे प्रवासी हैराण झाले असून या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व त्याला पाठीशी घालणार्‍यांवर कारवाई व्हावी,अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

या अपघातात रिक्षाचालक प्रशांत किसन भिंगारदिवे यांच्यासह ताराबाई फकिरा पवार, मच्छिंद्र दादा मगर व इतर दोन असे पाच जण गंभीर जखमी झाले असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्व प्रवासी आंबी-अंमळनेर येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी येत होते.

अवघ्या सहा ते सात महिन्यांपूर्वी आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येते. काम पूर्ण होताच अवघ्या काही दिवसांतच या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली होती. तसेच रस्ताही ठिकठिकाणी खचला आहे. नियमाप्रमाणे एक वर्षापर्यंत रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र ‘सो-धा’मुळे यावर बोलायला कोणी तयार नाही. रस्त्यातील खड्ड्यांमुळे या भागात अनेक छोटे अपघात नित्याचे झाले आहेत. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण यांना याच खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागतो.

काही दिवसांपूर्वी एका स्थानिक सोशल मीडिया समूहावर सदर रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोस्ट व्हायरल होताच ठेकेदाराने लगबगीने खड्डे दुरुस्ती करण्याची तत्परता दाखवली. मात्र पुन्हा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे झाली. या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व त्याला पाठीशी घालणार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

निकृष्ठ प्रतीच्या कामामुळे शासनाचा लाखोंचा निधी खड्ड्यात गेला. अपघातामुळे जीवितहानी झाली असती तर त्यास जबाबदार कोण? टक्केवारी घेऊन सुस्तावलेले प्रशासन बळी गेल्यावर जागे होणार आहे का? आठ दिवसांत रस्त्याचे खड्डे न बुजवल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन केले जाईल, असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय संसारे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या