रस्त्याच्या निकृष्ट कामाची पाहणी करणार्‍यास ठेकेदाराकडून जीवे मारण्याची धमकी

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील मातुलठाण येथील मातुलठाण-गोंडेगाव या मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे करत आहेत. संबंधीत रस्त्याच्या कामाकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. या रस्त्याची पहाणी करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्याला या ठेकेदाराने मोबाईलवरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मातुलठाण येथील मातुलठाण-गोंडेगाव या मुख्य रस्त्याच्या कामासाठी आमदार विकास निधीतून 50 लक्ष निधी दिला आहे. गेल्या वर्षापासून या रस्त्याचे काम ठेकेदार मर्जीप्रमाणे करत आहेत या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी खडी कमी प्रमाणात वापरून त्यावर माती मिश्रीत मुरूम टाकून सर्व साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे टाकले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोर्डे यांनी ठेकेदाराला विचारणा केली असता संबंधित ठेकेदाराने हुज्जत घालून मोबाईलवरून तु कोण मला सागणारा? तु काय अधिकारी आह का? असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी ठेकेदाराविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांनी काही ग्रामस्थांच्या तक्रारी आल्याने पाहणी करून संबंधित ठेकेदाराला समज दिली होती. पण दोन दिवस उलटत नाही तर परत ठेकेदाराकडून धमकी दिली. यावरुन या संबंधित ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ठेकेदाराची एवढी मुजोरी वाढली आहे? अशी चर्चा सध्या परिसरात होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *