Saturday, April 27, 2024
Homeनगरनदीजोड प्रकल्प पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील क्रांतिकारी पाऊल - ना. पटेल

नदीजोड प्रकल्प पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील क्रांतिकारी पाऊल – ना. पटेल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नदीजोड प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक क्रांतिकारी पाऊल आहे. महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. 42 हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी केंद्र सरकारने केली असून, राज्याची संमती येताच या प्रकल्पाला मूर्त स्वरुप येईल, अशी ग्वाही जलशक्ती व अन्नप्रक्रीया केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रल्हाद पटेल यांनी दिली.

- Advertisement -

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिर्डी लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री ना. पटेल यांचा लोकसभा प्रवास योजना अंतर्गत मतदारांच्या गाठीभेटी आणि संघटनात्मक आढावा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर मंत्री पटेल यांनी स्थानिक उद्योगपती, कृषी व्यवसायीक, व्यवसायीक, डॉक्टर्स, वकिल, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. विविध प्रश्नांना उत्तरे देतानाच केंद्र सरकारची विकासाबाबतची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. मतदार संघाचे प्रभारी आ. डॉ. राहुल आहेर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

नदीजोड प्रकल्पा संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर भाष्य करताना मंत्री ना. पटेल म्हणाले, नमामी गंगा योजनेमधून प्रधानमंत्र्यांनी हरिव्दार ते ऋषिकेशपर्यंत पाण्याचे नुसते शुध्दीकरण केले नाही तर, ते पिण्यासाठी योग्य बनविले. 42 पाणी शुध्दीकरण प्रकल्प बसवून ही योजना केंद्र सरकारने यशस्वी करून दाखविली. त्याच धर्तीवर नदीजोड प्रकल्प सुध्दा मोदीजींचे एक क्रांतिकारी पाऊल आहे. देशातील पाच मोठ्या नद्यांना एकत्र जोडण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सरकारने कायदाही केला.

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांमध्ये हे काम यशस्वीपणे झाल्यामुळे 12 लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व सिंचनासाठी 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पाण्याची उपलब्धता झाली. विजेचे प्रकल्प आणि सौर उर्जेचे प्रकल्पही आता उभे राहत असून, इच्छाशक्ती दाखविल्यामुळेच याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. याकडे लक्ष वेधून मंत्री पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्यादृष्टीने सुध्दा नदीजोड प्रकल्प हा एक निर्णायक टप्पा ठरेल. यामध्ये काही आंतरराज्यीय प्रश्न आहेत, ते प्रश्न सुटले आणि राज्याची संमती लगेच आली तर या प्रकल्पाला निश्चितच मूर्त स्वरुप येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

छोट्या उद्योजकांना आयकर आणि जीएसटीच्या संदर्भात माहिती मिळण्याबाबत येत असलेल्या अडचणींकडे आपण सरकारचे लक्ष वेधू, असे आश्वासनही त्यांनी दिले. अ‍ॅड. वर्पे यांनी केंद्र सरकारने यापूर्वी काही कायद्यांमध्ये बदल केले तर, जुने कायदे रद्द केले आहेत त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करून आणखीही काही कायद्यांबाबत विचार करण्याची सूचना केली.

याप्रसंगी उद्योगपती राजेश मालपाणी, दीपक मनियार, चंद्रकांत पेमगिरीकर, सुभाष कोथमीरे, मनीष मालपाणी, संजय राठी, विजय धायगुडे, सौ. निला जोशी, प्राध्यापक श्रीहरि पिंगळे, डॉ.अशितोष माळी, अ‍ॅड. बापुसाहेब गुळवे, उद्योगपती नितीन हासे, अंबर सराफ आदिसंह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मीता गुणे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या