Friday, April 26, 2024
Homeनाशिकगोदावरीला अस्वच्छतेचा विळखा

गोदावरीला अस्वच्छतेचा विळखा

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

संपूर्ण देशभरात दक्षिण काशी म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. मात्र, गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्येच ही नदी कचरा आणि सांडपाणी प्रकल्पाच्या अस्वच्छ पाणी प्रक्रियेमुळे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकार नदी संवर्धनासाठी नमामि गोदा प्रकल्प राबवित असून याअंतर्गत गोदावरी नदीचे जलप्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्वच्छता, संवर्धनासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. मात्र असे असले तरी आजच्या स्थितीला येथील प्रशासनाने नदीपात्रांकडे दुर्लक्ष केल्याने गोदावरीत घाण पाणी सोडण्याबरोबरच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या अहिल्या नदीपात्रात काळेशार सांडपाणी वाहताना दिसत आहे. तर शहरातील आजूबाजूस असलेल्या नाले, ओहोळांमध्ये कचर्‍याचे साम्राज्य असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातच गोदावरी नदीची अवस्था दयनीय झाल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर शहरात सध्या सांडपाणी स्वतंत्र करण्यासाठी भुयारी गटार योजना आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र उभारणीचे काम सुरू असून त्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. याआधी सुद्धा वेळोवेळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरी देखील येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची योग्य पद्धतीने दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कोट्यवधींचा निधी नेमका खर्च केला तरी कुठं? असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

घाटच बनले कचरा डेपो

त्र्यंबकेश्वर येथे मागील कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या स्नानासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नऊ कोटी रुपये खर्च करून घाट बांधण्यात आले होते. परंतु, आता तेच घाट दर पावसाळ्यात शहरातून नाल्यांद्वारे वाहून येणार्‍या कचर्‍यामुळे कचरा डेपो बनले आहेत. तसेच दोन कोटी रुपये खर्च करून रिंग रोडलगत असलेल्या अहिल्या आणि गोदावरी घाटांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, बाहेरून सौंदर्यीकरण झालेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने गोदावरी नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे.

गोदावरी नदीला देशभरात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गोदावरीची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. गोदावरी नदीच्या कडेलाच कचरा डेपो असल्याने पावसाळ्यात याठिकाणचा कचरा गोदावरीत वाहून जातो. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीत किंवा कचरा डेपोवर आणून टाकला पाहिजे. त्यानंतर कचरा डेपोच्या ठेकेदाराने त्या कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.

-विष्णू दोबाडे, माजी नगरसेवक, त्र्यंबक नगरपरिषद

- Advertisment -

ताज्या बातम्या