Thursday, April 25, 2024
Homeनगरनदीजोड प्रकल्पामुळे मुळा खोर्‍याला सव्वादोन टीएमसी पाण्याचा लाभ होणार

नदीजोड प्रकल्पामुळे मुळा खोर्‍याला सव्वादोन टीएमसी पाण्याचा लाभ होणार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

कोकणातील वाहून जाणारे पाणी नाशिक-नगर-मराठवाड्याला वळवून महत्त्वाकांक्षी अशा नदीजोड प्रकल्पाच्या समन्वय कक्षाच्या स्थापनेला

- Advertisement -

हिरवा कंदिल मिळाल्यामुळे आता मुळा नदीखोर्‍यात सव्वा दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी स्वागत केले आहे.

शासन व जलसंपदा विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रस्तावित होता. नगर जिल्ह्यातील मुळा नदीखोर्‍यातून मराठवाडा व मुळा प्रकल्पाला अतिरिक्त सव्वा दोन टीएमसी पाणी मिळणार आहे. प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात सिंचनाला याचा लाभ होण्यास मदत होणार आहे. मराठवाड्यासह नगर – नाशिक या जिल्ह्यांना लाभदायक अशा या प्रकल्प समन्वय कक्षाची नाशिक येथे स्थापना करण्यास जलसंपदा विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे.

यापूर्वी गोदावरी खोर्‍यातील 30 योजनांपैकी बारा योजना पूर्ण झालेल्या आहेत. नगर, नाशिक, औरंगाबाद या तीन जिल्ह्यात या योजना असल्या तरी त्यापैकी बारा योजना पूर्ण झालेल्या आहेत. या तिन्ही जिल्ह्यांसाठी महत्वाच्या अशा अकरा महत्त्वाकांक्षी योजनांचा दीर्घकाळापासून विषय महाराष्ट्र शासन व जलसंपदा विभागाकडे प्रलंबित राहिला. याविषयी अनेकवेळा राजकीय गदारोळ देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

कोकणातील दमणगंगा- वैतरणा- गोदावरी, एकदरी, पार गोदावरी प्रकल्प अशा एकूण 11 प्रस्तावित प्रकल्पांमध्ये नगर नाशिक-गोदावरी खोर्‍यात 25 टीएमसी पाणी वळवणे हे प्रवाही व योजनेअंतर्गत राबविण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यापैकी पश्चिम वाहिनीकडून उल्हास नदीच्या बकेटमधून काळू प्रकल्पातील पाणी व अन्य भागातील पाणी हे खिरेश्वर व साधडा घाट -पाथरघाट येथून एकूण 65. 76 अर्थात सव्वा दोन टीएमसी ( दोन हजार तीनशे बत्तीस दशलक्ष घनफूट ) पाणी उपलब्ध होणार आहे.

यासह भंडारदरा धरणाकडे अकोले तालुक्यातील हिवरा व साम्रदहून देखील पाणी उपलब्ध होणार आहे. माजी खासदार पद्मभूषण स्व. डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी पाणी परिषद घेऊन याविषयी जनजागृती केली होती. त्यांचे स्वागत सर्वत्र झाले.

मात्र, त्यांचे स्वप्न त्या काळात साकारले गेले नाही.राहुरी येथील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुळा धरण प्रकल्पात नदीवरील बंधार्‍यात दहा टक्के पाणी राखीव ठेवण्याबाबत पुढाकार घेतला होता. मुळा धरणातील गाळ काढून धरण पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याबाबतही पुढाकार घेतला आहे. त्यांची मुळा खोर्‍यातील सिंचन व पाण्याबाबत ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान या समन्वय कक्षासाठी नाशिक मुख्य अभियंता (नदीजोड प्रकल्प समन्वय), अधीक्षक अभियंता, वळण योजना गोदावरी खोरे, नाशिक, कार्यकारी अभियंता, वळण योजना गोदावरी खोरे, नाशिक, या व अन्य अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समन्वय कक्षास कार्यवाहीचा आढावा सादर करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या