Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र१ ऑक्टोबरला रिक्षा चालकांचा संप

१ ऑक्टोबरला रिक्षा चालकांचा संप

पुणे(प्रतिनिधी)

रिक्षा संघटनांच्या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने, विम्याचा परतावा न मिळाल्याने आणि राज्य सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील रिक्षा चालकांनी संपाची हाक दिली आहे. १ ऑक्टोबर रोजी रिक्षाचालकांनी हा संप पुकारला आहे.

- Advertisement -

पुण्यात रिक्षाचालकांचा संपाविषयी बोलताना रिक्षा पंचायत समितीचे पदाधिकारी नितीन पवार म्हणाले, कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झालेत. अजूनही पुढचे सहा महिने राज्यातील परिस्थिती अशीच राहील, अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे, सर्वसामान्य लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य शासन करत आहे. मग अशा परिस्थितीत ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांनी खावं काय? त्यांनी जगायचे कसे? याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे. यामध्ये रिक्षाचालक, मालकांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सरकारला लॉकडाऊनच्या काळात या रिक्षाचालकांचा विसर पडला आहे. रिक्षाचालकांचा प्रश्न घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आम्हाला प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांची बदली झाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला, असे ते म्हणाले.

संपाला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा विरोध

रिक्षा पंचायत पुणेतर्फे १ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. याला महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने विरोध दर्शवला असून यात रिक्षा चालकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

माहिती देताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळेरिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पाठिंबा न देता रिक्षा चालक आणि मालक यात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. येत्या ३० सप्टेंबरला संपूर्ण राज्यात महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, असे कांबळे म्हणाले. त्याचबरोबर, रिक्षा पंचायतने पुकारलेला बंद हा अत्यंत चुकीचा आहे. सध्या रिक्षा व्यवसायच बंद आहे. त्यात तुम्ही बंद पुकारत आहात. एकीकडे अवघा महाराष्ट्र अनलॉककडे जात आहे. मात्र, रिक्षा पंचायत बंद पुकारत आहे. ही शोकांतिका आहे. रिक्षा पंचायत घेत असलेल्या अशा निर्णयांमुळे रिक्षा चालकांचे अनेक वर्षांपासून नुकसान झालेले आहे. या बंदला आमचा पाठिंबा नाही. त्यात कोणताही रिक्षा चालक सहभागी होणार नाही. तसेच, रिक्षा चालकाने सहभागी होऊ नये, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या