Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार?

राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार?

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारात माजी वनमंत्री संजय राठोड आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असेही म्हटले जात आहे.

- Advertisement -

माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात राठोड पुनरागमन करतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाबाबतही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद आणि प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्री पद देण्यात येईल, असे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापूर येथे त्याबाबत कार्यकर्त्यांची इच्छा प्रदर्शित केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप काम केले आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेसुद्धा सतत निवडून येत आहेत, असे सांगून राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून त्यांना मंत्रिपद देण्यात येईल, असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला.

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी या चर्चांच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या