Wednesday, April 24, 2024
Homeनगरसहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल - मराठे

सहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल – मराठे

लोणी |प्रतिनिधी| Loni

देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुळच सहकार चळवळीशी जोडले गेलेले आहे. सहकार चळवळ आता केवळ संस्थांपुरती मर्यादीत न ठेवता सेवा क्षेत्रांच्या माध्यमातूनही पुढे आली पाहिजे. सहकाराला आता सर्वव्यापी होऊन नवे आर्थिक मॉडेल तयार करावे लागेल. या क्षेत्राकडे युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी सहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्ताने सतीश मराठे यांचे सहकार आणि आर्थिक विकास या विषयावरचे व्याख्यान पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अध्यासन केंद्र आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. मुकुंदराव तापकीर, अशोक सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. एस. झेड. देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा बँकेचे चेअरमन अशोक म्हसे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन काका कोयटे, कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

सतीश मराठे म्हणाले, सहकार चळवळीने देशाच्या आर्थिक विकासात मोठी भागिदारी केली असली तरी, बदलत्या युगात अद्यापही समाजातील मोठा वर्ग हा आर्थिक प्रक्रियेपासून दूर आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी या चळवळीतून निर्माण झाल्या असल्या तरी याचे अधिक सशक्तीकरण करून बळकटी देण्याची गरज आहे. विकासाकरिता कर्जपुरवठा वाढला पाहिजे, लोकांपर्यंत जातील अशा संस्थांची कार्यपध्दती निश्चित करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी संस्था या सेवा संस्था नाहीत तर त्या नफा मिळवून देणार्‍या संस्था आहेत. त्यादृष्टीने इतर देशांनी विविध क्षेत्रांत सहकाराचा कसा उपयोग करून घेतला याचे दाखले दिले. भारतात इफको सारखी संस्था खत विक्रीच्या माध्यमातून नावलौकीक मिळविते. अमुल सारखी संस्था केवळ दूग्ध उत्पादनात मर्यादीत न राहता अन्नप्रक्रिया उद्योगात रुपांतरीत होते. त्याचप्रमाणे कृषी प्रक्रिया उद्योगाला सहकाराच्या माध्यमातून मोठ्या संधी आहेत. आता विमा आणि आरोग्य क्षेत्रातही सहकाराने प्रवेश करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आ.राधाकृष्ण विखे म्हणाले, पद्मश्रींनी स्थापन केलेल्या लोणी बुद्रुक सेवा सहकारी सोसायटीस 100 वर्षे पूर्ण होत आहेत आणि डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमिवर या सोसायटीचा शताब्दी समारंभ देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे, एस.झेड.देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के यांनी सहकारी बँकांसमोरील असलेल्या प्रश्नांची मांडणी आपल्या भाषणात केली. अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. मुकुंदराव तापकीर यांनी सहकार चळवळीत युवकांचा सहभाग वाढावा म्हणून अध्यासन केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या