Thursday, April 25, 2024
Homeजळगावशोध सामर्थ्याचा : मायटी ब्रदर्स: बस नाम ही काफी है!

शोध सामर्थ्याचा : मायटी ब्रदर्स: बस नाम ही काफी है!

आज मोठे आर्टिस्ट आपल्या कार्यक्रमासाठी मायटी ब्रदर्सचीच साऊंड सिस्टिम हवी; असा आग्रह धरतात, शिफारस करतात. हा त्यांचा मायटी ब्रदर्सच्या सेवेवर असलेला विश्वास आहे, यातच समाधान आहे, आनंद आहे. आज सर्वत्र नाव झालेले आहे, त्यामुळे जबाबदारीही दुपटीने वाढली आहे. कलावंतांचा हा विश्वास टिकवणे महत्त्वाचे असते. गेल्या 71 वर्षांपासून साऊंड सिस्टिमची सेवा देणार्‍या मायटी ब्रदर्सचे तिसर्‍या पिढीतील संचालक मिलिंद थत्ते सांगत होते.

मिलिंद थत्ते यांचे पणजोबा यशवंत थत्ते हे रेल्वेत नोकरी करत होते. निवृत्तीनंतर ते जळगावला स्थायिक झाले. त्यांचा एक मुलगा मनोहर थत्ते, शालेय शिक्षणानंतर जळगावला रेडिओ अ‍ॅण्ड साऊंड सिस्टिमच्या दुकानात नोकरीस लागले. अनुभव घेतल्यानंतर त्यांनी स्वत:चे साऊंड सिस्टिमचे दुकान स्वत:च्या नावांची इंग्रजी आद्याक्षरे एमवायटी (मायटी) घेऊन 26 जानेवारी 1951 रोजी दुकान सुरू केले. रेडिओ, ट्यूबलाइट, पंखे यांचे सुटे पार्ट मिळत. ते एकत्र जोडून घरी फिटिंग करून देण्याचे काम ते करत. मनोहररावांना त्यांचा भाऊ भास्कर हा येऊन मिळाला. दोन्ही भावांनी हे काम करण्यास सुरुवात केली. यावेळी दुकानाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल झाला MYT चे MIGHTY होऊन त्यापुढे ब्रदर्स लागले, तेच आजचे मायटी ब्रदर्स.

- Advertisement -

मनोहर थत्ते बाबा म्हणून जळगावात प्रसिध्द. 1967 मध्ये मनोहर थत्ते यांनी मुंबईच्या गोवा हिंदू असोसिएशन, नाट्य मंदिर, नाट्यसंपदा अशा अनेक नामांकित नाट्य संस्थांची व्यावसायिक नाटके जळगावला नाट्यरसिकांसाठी मागवण्यास सुरुवात केली. नाटकाचे बुकिंग करणे, जाहिरात साऊंड सिस्टिम सारे काही बाबा थत्तेंचेच असे. एका टांग्यात बाबा बसून, सायकल रिक्षात बसून, टांग्याला- रिक्षाला भोंगा लावून आपल्या विशिष्ट अशा शैलीत बाबा थत्ते जाहिरात करत असत. त्यांची जाहिरात करण्याची ही शैली, पध्दत जळगावात प्रसिध्द झाली होती. नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी तर ही जाहिरात ऐकून एका लेखात नाटकाची जाहिरात अशीही करता येते, हे मला जळगावला ही जाहिरात ऐकल्यावर कळले; असा अभिप्राय नोंदवत या जाहिरातीस दाद दिली.

अपडेट राहाल तरच टिकाल! आजच्या सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये परफॉर्मन्सला महत्त्व आहे, तो उत्तम असायला हवा. येथे वेगवेगळ्या कलावंतांशी, तंत्रज्ञांशी सतत संपर्क येत असतो. त्यातून सतत शिकायला मिळते. मोठे आर्टिस्ट मायटीची साऊंड सिस्टिमची मागणी करतात, शिफारस करतात हा आमच्यावरील विश्वास आहे, यात आनंद, समाधान आहे. शो मस्ट गो ऑन हे सूत्र आम्हा टेक्निशियन्ससाठीही असते हे विसरून चालत नाही. रोज शिकून अपडेट होणार का? तंत्रज्ञानाची आवड हवी. इथे रोजगाराची संधी आहे. हे क्षेत्र समुद्र आहे, येथे रोज नवीन संधी येत आहे, अपडेट राहाल तर टिकाल अन्यथा दूर फेकले जाल. कारण बदल हा स्वीकारावाच लागतो, असा कानमंत्र मिलिंद थत्ते देतात.

मनोहर थत्तेंना दोन मुले, मोहन आणि मुकुंदा. दोघांनी आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरूवात केली. मुकुंदाला स्वरांचे उत्तम ज्ञान. तो त्यात बुडून जात असे. नाटकाबाबतचे विलक्षण प्रेम. व्यवसायात रस. त्यामुळे व्यवसाय बहरला. मोहन यांना साऊंडच्या क्षेत्रात नवीन कोणते तंत्रज्ञान येते ते जाणून घेण्यात रस. मोहन थत्ते सांगतात, मुंबईला तंत्रज्ञान येते ते नेहमी अपडेट असते. यामुळे महिन्यातून दोन ट्रीप मुंबईला होत असत. जे जे नवीन असेल ते ते घेऊन येत असे. यास मुकुंदाने नेहमीच भक्कम पाठिशी उभे राहून पाठिंबा दिला. हॅलोजन, जनरेटर, कॉर्डलेस माईक हे प्रथम मायटी ब्रदर्सने आणले. साऊंड सर्व्हिसबाबत उत्तर महाराष्ट्रात नाव झाले.

मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभांसाठी मायटी ब्रदर्सची साऊंड सिस्टिमची मागणी होऊ लागली. जळगावला मोरारजी देसाई, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी बाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्या सभा, काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेला मेळावा यशस्वी होण्याचे श्रेय मायटी ब्रदर्सच्या साऊंड सिस्टिमलाही आहे.नाशिकपासून नंदुरबार, बर्‍हाणपूर, खंडवा, अकोलापर्यंत सभा असो, साऊंड सिस्टिम मायटीचीच हवी, अशी मागणी असते. हाती घेतलेले काम उत्तम झाले पाहिजे हा त्यामागे ध्यास असतो, त्यातून समाधान मिळते, असे मोहन थत्ते सांगतात.

मुकुंदा थत्तेंच्या अकाली निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी मोहन थत्तेंवर पडली. मुकुंदांचा मुलगा मिलिंद 2005 मध्ये सहाय्यास आला. एमबीए आणि लॉ चे शिक्षण घेतलेला मिलिंद हा मायटी ब्रदर्सच्या तिसर्‍या पिढीतील नवं विचारांचा आणि टेक्नोसेव्ही ठरला. 2002 नंतर आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे लाईट आणि साऊंड विषयक मटेरियल बाजारात येऊ लागले होते. देश विदेशात या मटेरियल विषयक प्रदर्शनाच्या माध्यमातून ते पाहायला मिळू लागले होते. मिलिंद यांनी सिंगापूर – चायनापासून अनेक ठिकाणी भरलेल्या या प्रदर्शनास भेटी देऊन नव तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेत हे मटेरियल घेण्यास सुरुवात केली. कंपन्यांनी या नवतंत्रज्ञानाने युक्त मटेरियल वापरासंबंधात प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मुंबईत केली. मायटी ब्रदर्सने आपल्या कर्मचार्‍यांना मुंबईत हे ट्रनिंग देत व्यवसायात अत्याधुनिक बनवले.

पूर्वी परदेशातील टेक्नॉलॉजी जळगावात येण्यास 10 वर्षांचा काळ लागत असे. आज यू-ट्यूब, इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती तत्काळ पोहोचत आहे. लोक विविध माध्यमातून दिसणारे हे तंत्रज्ञान आपल्याकडे मागू लागले. इंडियन आयडॉलमधील कलाकार आंतरराष्ट्रीय शो करू लागले. त्यांना आंतरराष्ट्रीय सरावातील मटेरियल उपलब्ध होत असे नंतर ते देशातही त्या मेटरियलची मागणी करू लागले. काळानुसार लोकांची गरज भागवणे गरजेचे ठरले. आज वापरात असलेली साऊंड सिस्टिम ही अत्यंत किमती आहे. 2001 पूर्वी संगणकाचे ज्ञान नसलेलेदेखील साऊंड सिस्टिमचे काम करत.

आज संगणक तज्ज्ञांची गरज भासते आहे. साऊंड इंजिनियर उपलब्ध होत आहेत. लाईट विषयक तंत्रज्ञान देणारे विविध कोर्सेस अनेक ठिकाणी सुरू असून त्यास प्रचंड मागणी आहे. स्टेजवरील पडद्यामागे ग्राफिक्स बनवले जातात, डिझाईन केले जातात. नंतर ते वापरले जातात. व्हिडिओ, ऑडिओ, लाईट डिझायनिंग ग्राफिक्सचे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. सातत्याने लाईट आणि साऊंडमध्ये बदल होत असल्याने आज मायटी ब्रदर्सकडे असलेली सिस्टिम ही अत्याधुनिक असल्याचे मिलिंद थत्ते हे अभिमानाने सांगतात.

आजच्या सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये परफॉर्मन्सला महत्त्व आहे, तो उत्तम असायला हवा. येथे वेगवेगळया कलावंतांशी तंत्रज्ञांशी सतत संपर्क येत असतो. त्यातून सतत शिकायला मिळते. मोठे आर्टिस्ट मायटीची साऊंड सिस्टिमची मागणी करतात, शिफारस करतात हा आमच्यावरील विश्वास आहे, यात आनंद, समाधान असल्याचे मिलिंद थत्ते सांगतात. शो मस्ट गो ऑन हे सूत्र आम्हा टेक्निशियन्ससाठीही असते; हे विसरून चालत नाही.

या धंद्यात येण्यापूर्वी संगीताची आवड आहे का? रोज शिकून अपडेट होणार का? तंत्रज्ञानाची आवड हवी. इथे रोजगाराची संधी आहे. हे क्षेत्र समुद्र आहे, येथे रोज नवीन संधी येत आहे, अपडेट राहाल तर टिकाल अन्यथा दूर फेकले जाल. कारण बदल हा स्वीकारावाच लागतो, असा कानमंत्र मिलिंद थत्ते देतात.

संपर्क –

मो. 9422277067

facebook- https://www.facebook.com/mightylive/

- Advertisment -

ताज्या बातम्या