लालफितीत अडकलेली 60 ‘रेमडेसिवीर’ अखेर रुग्णांपर्यंत पोहचली

jalgaon-digital
2 Min Read

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

अनेक कोव्हिड पेशंट रेमडेसिवीर अभावी जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत होते. प्रशासनाकडून मात्र उपलब्ध रेमडेसिवीर वितरणाची परवानगी वेळीच मिळत नव्हती. अर्ध्या तासात रेमडेसिवीर न दिल्यास ती ‘लुटून’ रुग्णांना देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शेलार यांनी दिला. यावेळी त्यांच्यासोबत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शाम जरे व राजेंद्र काकडे उपस्थित होते. त्यानंतर सदरील रेमडेसिवीर वितरित करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यावर रुग्णांचा जीव भांड्यात पडला.

यासंदर्भात श्री.शेलार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली माहिती अशी, रेमडेसिवीर इंजेक्शनचे साठ नग काल रात्रीपासून येथील एका मेडिकल मध्ये उपलब्ध होते. औषध निरीक्षक व जिल्हाधिकार्‍यांनी नेमलेले अधिकारी यांच्या परवानगीशिवाय त्याची विक्री करता येत नव्हती. याबाबत प्रशासनाने सदरील मेडिकलला विक्री बाबत सूचना दिल्या नव्हत्या.म्हणून औषध विक्रेता सदर इंजेक्शन रुग्णांना देत नसल्याची बाब समोर आली. त्यावर शेलार व गायकवाड यांनी तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क केला.

ही बाब आपल्या अखत्यारीत नसल्याने आपण रेमडेसिवीर विक्रीचा आदेश देऊ शकत नसल्याचे म्हणत त्यांनी हातवर केले. त्यानंतर नगरच्या औषध निरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांना फोन केला. आपण मिटिंगमध्ये असून, नंतर याबाबतचे आदेश देऊ, असे म्हणत टोलवाटोलवी केली. यावर शेलार भडकले व त्यांनी प्रशासनास अर्ध्या तासाची मुदत दिली.

या कालावधीत जर रेमडेसिवीर विक्रीचा आदेश न आल्यास सदर इंजेक्शन मेडिकल मधून ‘लुटून’ ते रुग्णालयात गरजुंना देण्याचा इशारा त्यांनी दिला. आमच्यावर हवे ते गुन्हे नोंदवा, असे आव्हान देखील त्यांनी दिले. अर्ध्या तासाच्या आत प्रशासनाने हालचाल करून इंजेक्शन विक्रीचा आदेश काढला. अन हे साठ इंजेक्शन शहरातील विविध रुग्णांना देण्यात आले. अशाप्रकारे या नाट्यावर पडदा पडला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *