Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांना दिलासा; डाळिंबांच्या जाळीला सरासरी 'इतका' रुपये भाव

शेतकर्‍यांना दिलासा; डाळिंबांच्या जाळीला सरासरी ‘इतका’ रुपये भाव

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तेल्या व मर रोगाच्या आक्रमणापासून बचावलेल्या बागेतील डाळिंबांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. क्वॉलिटी असलेल्या डाळिबाला 20 किलोच्या कॅरेटमागे साडेतीन हजारापर्यंत भाव मिळत असून सरासरी दोन ते अडीच हजार रूपये चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला भाव मिळत आहे. दररोज सात ते आठ हजार कॅरेट डाळिंबाची आवक होवून देखील भाव मिळत आहे. यंदा उन्हाळ कांद्याने आर्थिक गणित विस्कटून टाकले मात्र डाळींबाने आधार दिल्याने उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

तेल्या, मर रोगाने मोठ्या प्रमाणात डाळींब बागा फस्त केल्या आहेत. यामुळे डाळींबाचे आगार समजले जात असलेल्या मालेगाव, बागलाण तालुक्यात यंदा डाळींबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे देखील डाळींबाच्या भावास तेजी आली आहे. यापुढे देखील आवक मर्यादित राहणार असल्याने डाळींबाचे भाव अधिक वाढण्याची शक्यता फळांची खरेदी करणार्‍या बाजार समितीतील व्यापार्‍यांनी बोलून दाखविली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

कांद्यापाठोपाठ कसमादे पट्ट्यात विशेषत: मालेगाव, बागलाण तालुक्यात डाळिंबांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांतर्फे घेतले जाते. गेल्या काही वर्षापासून तेल्या, मर रोगाचे संकट घोंगावत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी खर्चास वैतागून बागांवर कुर्‍हाड चालवली होती. मात्र या रोगांचा सामना करत हक्काचे पिक म्हणून शेतकर्‍यांतर्फे बागा लावून बहार धरण्याचे धाडस पुन्हा दाखविले होते. यंदा जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात डाळींबाचा बहार धरण्यात आला होता. मात्र तेल्या, मर रोगाने पुन्हा आक्रमण केल्याने उत्पादक संकटात सापडले होते. अशातच बेमोसमी पाऊस व गारपिटचा तडाखा देखील डाळींब बागांना बसला.

या पावसामुळे हिट वाढल्याने वातावरण प्रदूषित होऊन तेल्या व मर रोगाने पुन्हा उचल खाल्ल्याने डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेल्या रोखण्यासाठी औषधाची मात्रा उपयोगी पडत नसली तरी बाग वाचविण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांतर्फे केला गेला. मात्र गारपिटीसह तेल्याच्या प्रादुर्भावाने यंदा मोठ्या प्रमाणात डाळिंबास फटका बसून उत्पादन घटले आहे. यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने डाळिंबास चांगला भाव मिळत आहे.

ज्यांनी बागा वाचविल्या अशा शेतकर्‍यांना कांद्याने रडविले असले तरी डाळिंबाने आर्थिक आधार दिला असल्याची प्रतिक्रिया जळगाव गा. येथील प्रगतशील शेतकरी रमेश अहिरे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली. तेल्या, मर रोगाच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात डाळींब बागांची हानी झाली आहे. छाटणी व मजुरीचे पैसे देखील मिळणार नाही अशी अवस्था डाळींबाची झाली आहे. मात्र ज्यांच्या बागा वाचल्या त्या उत्पादकांना डाळिंबाचा चांगला भाव मिळत असल्याचे अहिरे यांनी स्पष्ट केले.

येथील बाजार समितीत मालेगाव, बागलाण तालुक्यातून दररोज सहा ते आठ हजार कॅरेट डाळिबाची आवक होत आहे. मथुरपाडे येथील कमलाकर पवार या उत्पादकाच्या डाळींबास 3500 रूपये कॅरेट असा भाव मिळाला तर चांगल्या प्रतीच्या डाळिंबास 3 हजार रूपये व सरासरी 2 हजार ते अडीच हजार भाव कॅरेटमागे उत्पादकांना मिळाला आहे. एकदम हलक्या प्रतीच्या डाळिंबाला देखील 1200 ते 1400 रूपये भाव मिळत असून फुटलेला डाळींब देखील अडीचशे ते तीनशे रूपये कॅरेटप्रमाणे व्यापारी घेत असल्याने यंदा डाळींब उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आवक कमी झाल्यास आगामी काळात डाळिंबाचे भाव चार हजारावर कॅरेटमागे पोहचण्याची शक्यता व्यापार्‍यांनी बोलून दाखवली.

दर वाढण्याची शक्यता

अतीवृष्टी व गारपिटीचा तडाखा तसेच तेल्या व मर रोगाच्या आक्रमणाचा मोठा फटका बागांना बसून डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे क्वॉलिटी डाळिंबास साडेतीन हजार तर चांगल्या प्रतिच्या डाळिंबास दोन ते अडीच हजारापर्यंत भाव मिळत आहे. दररोज सात ते आठ हजार कॅरेट डाळींब येवून देखील भाव वाढत आहे. आगामी काळात आवक कमी झाल्यास डाळिबाचे भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. उत्पादकांनी डाळींब प्रतवारी करून आणल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया बाजार समिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भिका कोतकर यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

डाळींबाने उत्पादकांना आधार दिला

यंदा उन्हाळ कांद्यास कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत तेल्या, मर रोगाचा सामना करत बागा वाचविणार्‍या डाळींब उत्पादकांना यंदा चांगला भाव मिळत असल्याने मोठा दिलासा लाभला आहे. तेल्यामुळे मोठ्या प्रमाणात बागा उध्दस्त झाल्या त्यामुळे क्षेत्र कमी झाल्याने डाळींबाचे उत्पादन घटले असल्यानेच भाव वाढला आहे. बागेतच 121 रूपये किलो दराने डाळींबाची खरेदी केली गेली. त्यामुळे डाळींब उत्पादकांना मोठा दिलासा मिळत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र डाळींब संघाचे उपाध्यक्ष अरूण देवरे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या