Thursday, April 25, 2024
Homeनगरलिपिकांच्या वेतन त्रुटीबाबत वित्त विभागाला प्रस्ताव पाठविणार

लिपिकांच्या वेतन त्रुटीबाबत वित्त विभागाला प्रस्ताव पाठविणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतन त्रुटी संदर्भात ग्रामविकास विभागाकडून सकारात्मक प्रस्ताव वित्त विभागाला पाठविण्यात येणार आहे.

- Advertisement -

याशिवाय समान काम, समान वेतन, समान पदोन्नतीच्या टप्प्याबाबतही ग्रामविकास विभागाचे अभिप्राय समितीस पाठविण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या बैठकीस उपसचिव जाधव, अवर सचिव माने यांच्यासह महाराष्ट्र राज्य जि.प.लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव अरूण जोर्वेकर, राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर, राज्य समन्वयक सागर बाबर, नगर कार्याध्यक्ष चेतन चव्हाण, अविनाश गावडे आदी उपस्थित होते.

लिपिकवर्गीय कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करणे व पुन्हा त्याच पदावर जाण्यासाठी पंधरा वर्षाची अट 3 वर्ष करणे, एकाकी पदाच्या एक किंवा दोन बदल्या करण्याची अट रद्द करणे, विभागीय आयुक्तांकडील खास बाब बदल्या करण्यासंदर्भात तात्काळ आदेश निर्गमित करणे, संघटना पदाधिकार्‍यांना बदल्यांमध्ये सूट देणे इत्यादी विषयांबाबत चर्चा झाली.

वरिष्ठ सहाय्यक यांची पदे 100 टक्के पदोन्नतीने भरणे, स्पर्धा परीक्षेचे अट सात वर्ष ऐवजी तीन वर्ष करणे आदी यासंदर्भात चर्चा झाली. सर्व प्रश्नांवर राजेश कुमार यांनी सकारात्मक चर्चा केली व प्रशासनास त्याप्रमाणे दुरुस्ती करणे बाबत आदेश दिले. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश दाभाडकर, मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष पंकज गुल्हाने आदींनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या