Wednesday, April 24, 2024
Homeनगरसावकारीच्या वसुलीसाठी शिवीगाळ; सोनाळवाडीचे पती-पत्नी जेरबंद

सावकारीच्या वसुलीसाठी शिवीगाळ; सोनाळवाडीचे पती-पत्नी जेरबंद

कर्जत |वार्ताहर| Karjat

व्याजाने पैसे देऊन विनापरवाना सावकारी करत वसुलीसाठी शिवीगाळ व धमकी देणार्‍या तालुक्यातील

- Advertisement -

सोनाळवाडीच्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. भादंवि कलम 392, 504, 506 सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती रामदास कोंडे (वय 37) व रामदास कांतिलाल कोंडे (वय 45, दोघे रा. सोनाळवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. 28 मार्च रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी 23 मार्च रोजी सकाळी 8 वाजता फिर्यादीच्या मुलाकडून वसुलीसाठी दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेतली होती.

तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी आरोपींकडून ही गाडी जप्त केली आहे. फिर्यादी यांनी मागील दीड वर्षांपूर्वी त्यांच्या विहिरीचे काम करण्यासाठी आरोपी यांच्याकडे पैशाची मागणी केली असता आरोपींनी सावकाराचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या 30 हजार रुपये 4 रुपये शेकडा प्रती महिना व्याजदराने फिर्यादीला देऊन रकमेवर व्याजाची रक्कम 23 हजार रुपये व घेतलेल्या पैशाची मुद्दल असे एकूण 53 हजार 400 रुपये घेतले.

रकमेची वसुली करण्यासाठी आरोपी स्वाती कोंडे व तिचे पती यांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करून छेडछाडीची केस करण्याची धमकी दिली. दि. 23 मार्चला फिर्यादीची 15 हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल फिर्यादीचा मुलगा सौरभ याच्याकडून बळजबरीने हिसकावून घेतली.

याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार तुळसीदास सातपुते, गणेश ठोंबरे, मारुती काळे, सागर म्हेत्रे, अमित बरडे यांनी केली.

कोणीही बेकायदेशीरपणे सावकारी करत असल्यास तसेच पैसे वसुलीसाठी मारहाण करणे, घरातून वस्तू नेणे, वारंवार मानसिक छळ करणे हे करत असल्यास कर्जत पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या