चारी दुरुस्तीचे कारण दाखवून पाणी देण्यास टाळाटाळ

jalgaon-digital
1 Min Read

बेलापूर |वार्ताहर| Belapur

चारी दुरुस्तीचे कारण दाखवून रब्बी हंगामाच्या रोटेशनचे पाणी शेतकर्‍यास देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आणि चारीचे अतिरिक्त पाणी मात्र ओढ्याद्वारे थेट नदीपात्रात वाहुन गेल्याची तक्रार शेतकरी संजय गवनाथ गोपाळे यांनी केली आहे. या संदर्भात वळदगाव ग्रामपंचायतीने पंचनामा करुन वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे तक्रार पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचे रोटेशन सुरु असून त्यासाठी वळदगावचे शेतकरी संजय गवनाथ गोपाळे गट नंबर 30 पैकी एक एकर ऊस व 10 गुंठे घास पिकासाठी रितसर सात नंबर फॉर्म भरलेला आहे. मात्र पाटकर्‍याने सदर रोटेशन सुरु असतानाच चारी दुरुस्तीचे कारण दाखवून अर्जदार शेतकरी संजय गोपाळे यांना पिकासाठी पाणी देण्याचे टाळून त्यांची अडवणूक केली. रोटेशनचे अतिरिक्त पाणी तसेच पुढे ओढ्याद्वारे नदीपात्रात वाहून जात त्याचा अपव्यय झाला. अशी शोषित शेतकर्‍याची तक्रार आहे.

या घटनेची माहिती मिळताच वळदगावचे माजी सरपंच बाबासाहेब शेटे पा., अ‍ॅड. मधुकर भोसले, रघुनाथ गवनाथ गोपाळे, संजय बाबासाहेब भोसले, राहुल प्रताप माळी आदींनी पंचनाम्यावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

सरपंच सौ. पुष्पा अशोक भोसले व ग्रामसेविका सौ. दिपाली आवटे यांच्या स्वाक्षरीने निवेदन वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी करुन शेतकर्‍यांची मनमानी अडवणूक करणार्‍या पाटबंधारे खात्याच्या पाटकर्‍यावर कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *