Thursday, April 25, 2024
Homeनगरवाचन उपक्रमाने विद्यार्थ्यांना इंग्रजीची लागली गोडी !

वाचन उपक्रमाने विद्यार्थ्यांना इंग्रजीची लागली गोडी !

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचना बाबत मनोबल कमी पडते. विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन करण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाधान वाटत नाही. हे प्रकार थांबावेत म्हणून राहाता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे यांनी शाळा भेटीच्या दरम्यान विद्यार्थी व शिक्षक यांना एकत्र घेऊन इंग्रजी वाचन कसे करावे याचे प्रात्यक्षिक प्रत्येक शाळेवर दाखविले.

- Advertisement -

दिवे यांनी इंग्रजी वाचनाच्या प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ तयार करून शिक्षकांच्या सर्व व्हाट्सअप ग्रुपवर वेळोवेळी पाठविले. यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानुसार शिक्षक या उपक्रमाची अंमलबजावणी करू लागले.

काही महिन्यातच विद्यार्थी अगदी सोप्या पद्धतीने आणि आवडीने इंग्रजी वाचू लागले. रांजणखोल शाळेच्या शिक्षिका सविता मेहत्रे यांनी संजीवन इंग्रजी वाचन उपक्रम आहेच मुळी नामी. जिल्हा परिषदेचा विद्यार्थी, पडणार नाही कुठेच कमी, अशी प्रतिक्रिया नोंदविली.

चोळकेवाडी येथील शिक्षिका संगीता गडगे यांनी उत्कृष्ट दर्जाचे अधिकारी असतील तर नक्कीच जिल्हा परिषद शाळांचा नावलौकिक होईल. गावातील सर्व नागरिक आमचे कौतुक करीत आहेत. तुमचे विद्यार्थी फाडफाड इंग्रजी वाचन करत आहेत, या प्रकल्पामुळे आमच्या कामाचे कौतुक होत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व शाळांनी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. शाळा भेटी करताना प्रशासकीय कामकाज करता- करता हातात पुस्तक घेऊन शिकवणारा अधिकारी अनुभवायला मिळाल्यामुळे शिक्षक वर्ग देखील समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संजयकुमार कुलकर्णी यांनी दिली.

पालक जालिंदर कानडे म्हणाले, माझा मुलगा इंग्रजी चांगले वाचू शकतो. यामुळे आम्हाला आनंद वाटतो. पालक अश्विनी कानडे म्हणाल्या, माझ्या मुलीला यापूर्वी शाळेत येताना खूप भीती वाटायची, परंतु आता तिला शाळेची आवड लागली आहे.

संजीवन इंग्रजी वाचन उपक्रमामुळे पालक वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढून शाळेचा पट देखील वाढणार आहे. आपले पाल्य शाळेत कशा प्रकारे शिक्षण घेतात हे पालकांना घर बसल्या कळते. सोशियल सोशल मीडियाचा वापर करून सदर संकल्पना अस्तित्वात आणता येते,हे या उपक्रमातून निदर्शनास येते.

– संजीवन दिवे

- Advertisment -

ताज्या बातम्या