‘रावसाहेब’ मध्ये 154 ठेवीदारांचे अडकले पावणे पाच कोटी

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

कष्ट करून ठेवी रूपात गुंतवणूक केलेला पैसा मुदत संपल्यानंतर देण्यास टाळाटाळ करणार्‍या रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा नागरी पतसंस्थेला न्यायालयाने दणका देत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले आहे. या पतसंस्थेत 154 ठेवीदारांचे चार कोटी 71 लाख 65 हजार रुपये रक्कम अडकलेली आहे.

सहकार विभाग व पोलिसांनी दखल न घेतल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशाने पतसंस्थेच्या तत्कालीन संचालकांसह जिल्हा उपनिबंधकाला यात आरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असला तरी ठेवीदारांना त्यांचा कष्टाचा मोबदला कधी मिळणार हा प्रश्न आहे.

रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत लघु उद्योजक, रिक्षाचालक, वॉचमन, विधवा, वृद्ध, पेन्शनर अशा 154 जणांनी ठेवी रूपात पैसे गुंतविले. 14 जून 2017 पर्यंत रावसाहेब पटवर्धन नावाने सुरू असलेल्या या पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने मुदत संपलेल्या ठेवीदारांना पैसे दिले नाही.

यानंतर 15 जून 2017 पासून ही पतसंस्था प्रवरा नागरी पतसंस्थेत विलीन करण्यात आली. पतसंस्थेचे विलिनीकरण केल्यानंतर देखील ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही. यामुळे इस्माईल गुलाब शेख यांनी अ‍ॅड. महेश आनंददास यांच्यामार्फत न्यायालयाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामध्ये शेख यांनी 154 ठेवीदारांच्यावतीने न्यायालयासमोर बाजू मांडली.

संस्थेत 154 ठेवीदारांचे 4 कोटी 71 लाख 65 हजार रुपये या पतसंस्थेत अडकलेले आहेत. न्यायालयात येण्यापूर्वी ठेवीदारांनी सहकार विभागाकडेे पाठपुरावा केला. मात्र, सहकार खात्याने देखील कुचराई केल्याचे शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळेच जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी जिल्हा सहकारी संस्था, नगर तालुका उपनिबंधक यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

ठेवींची मुदत संपल्यावर मुद्दल मिळत नसल्याने व्याज नको,किमान मुद्दल तरी द्या, अशी विनंती ठेवीदारांनी केली होती. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले नाहीत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतसंस्थेने काही लोकांच्या ठेवी परत केल्या आहे. तर, काही लोकांच्या ठेव पावत्या जमा करून घेतल्या आहेत. ज्यांच्या ठेव पावत्या जमा करून घेतल्या त्यांचे बचत खाते तयार करून त्यावर ठेव रक्कम वर्ग केली आहे. परंतु, बचत खात्यावर वर्ग केलेली रक्कम या ठेविदारांना काढता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुदत संपल्यानंतर ठेवीदारांना पैसे मिळाले नाहीत. यामुळे शेख न्यायालयात गेले. सद्य स्थितीत 154 लोकांचे चार कोटी 71 लाख 65 हजार रुपये रक्कम गुंतलेली आहे. मात्र, पतसंस्थेला सुमारे 45 कोटी रुपयांची रक्कम देणे असून व्याजासह 65 कोटी रक्कम वसुली करणे बाकी आहे. यामुळे ठेविदारांना त्यांची रक्कम देण्यासाठी पतसंस्थेला अडचण नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *