Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमातब्बर गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही- रवींद्र मिर्लेकर

मातब्बर गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही- रवींद्र मिर्लेकर

पुणे |प्रतिनिधी| Pune

“जे गेले त्यांच्या विषयी चिंता नाही. शिवसेनेतून अशी अनेक लोक गेलेले आहेत. मातब्बर गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे हा खरा इतिहास आहे. नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ गेले तरी काही फरक पडला नाही. कालचे आलेले गेले तर त्याने काय फरक पडणार आहे. हे तुम्ही आम्ही उभे केलेले भस्मासुर आहेत,” अशी टीका शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समनव्यक रवींद्र मिर्लेकर यांनी केली.

- Advertisement -

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरीत झालेल्या मेळाव्यात रवींद्र मिर्लेकर बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

निष्ठावंत आणि जिंकून येण्याची क्षमता असलेल्या शिवसैनिकाला तिकीट दिल पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

“पिंपरी-चिंचवडमध्ये देखील महापौर शिवसेनेचा असेल असं यश मिळो अस राऊत साहेब म्हणाले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले की, तिकीटाचे चांगल्या पद्धतीने वाटप केले पाहिजेत. कस वाटप करणार? प्रत्येक जण त्या ठिकाणी म्हणतो मी म्हणेल त्यालाच तिकीट दिल पाहिजे. ह्याला देऊ नका, त्याला देऊ नका. निष्ठावंत आणि जिंकून येण्याची क्षमता असलेल्या शिवसैनिकाला तिकीट दिल पाहिजे,” असे मिर्लेकर म्हणाले.

“जुन्नर येथे त्या गद्दाराबरोबर गेलेले काही शिवसैनिक पुन्हा पक्षात आले आहेत. जुन्नर येथे विधानसभा आणि लोकसभा प्रचंड मताधिक्य घेऊ. अशी स्थिती तेथील आहे. तर, शिरूर लोकसभा मतदार संघात काही व्यक्ती नागोबासारखी पदांवर बसलेली आहेत. त्यांना जर बाजूला केले आणि निष्ठावंत, कट्टर शिवसैनिकांना जवळ केले तर चांगलं काम करता येईल. याची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे. प्रत्येक शिवसैनिक जपला पाहिजे. त्यांचा वापर केवळ झेंडे लावण्याकरिता आणि घोषणा देण्यापूरता करू नका. त्याच्या खांद्यावर हात ठेवून चौकशी केली पाहिजे. अशा प्रकारचे नेतृत्व आणि वातावरण असलं पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

“खेड येथे गटबाजीमुळे पडलो, पंचायसमिती आपण गमावली. नेतृत्वाने या सर्वांचा विचार करण्याची गरज आहे. बाळासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खेड तालुका आहे. पहिली लोकसभा बाळासाहेबांच्या सभेमुळे जिंकली. त्यानंतर १५ वर्ष शिवाजी आढळराव पाटील हे खासदार होते. आज वाईट वाटतं शिवाजीराव यांना त्या जागेवर पाहू शकत नाहीत. हे पुन्हा जिंकणं शक्य आहे,” असे मिर्लेकर म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या