Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारगरजू महिलांना रेशन कार्ड, दिवाळीनिमित्त फराळ वाटप

गरजू महिलांना रेशन कार्ड, दिवाळीनिमित्त फराळ वाटप

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई सहाय्यीत नवनिर्माण संस्था संचलित लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात राबविला जात आहे.

- Advertisement -

या प्रकल्पांतर्गत गरीब गरजू निराधार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा म्हणून नवनिर्माण संस्था कार्य करीत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात बर्‍याच दिवसापासून वेगवेगळ्या कारणास्तव काही निराधार महिलांना रेशन कार्ड प्राप्त झाले नव्हते. काही गरीब, गरजू, निराधार महिलांना संजय निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला जात होता.

दिवाळी सणाचे औचित्य साधुन तहसीलदार थोरात यांनी नवनिर्माण संस्थेच्या कर्मचार्‍यांंची बैठक घेऊन आपण त्यांची ओळख संदर्भातील कागदपत्र दिल्यास मी त्वरित त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड व संजय निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करतो, हा विश्वास देऊन त्वरित दोन दिवसात 24 लाभार्थ्यांचे रेशन तयार करून तहसील कार्यालय येथे सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांंतर्गत 24 लाभार्थ्यांना रेशनकार्ड व दिवाळी फराळ देऊन त्यांना मदत करण्यात आली.

यावेळी जिल्हा सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.सतीश मलिये, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, नवनिर्माण संस्थेच्या वकील अ‍ॅड.विनया मोडक, जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सूर्यवंशी, नायब तहसीलदार रमेश वळवी, गोपाळ पाटील, पुरवठा निरीक्षक एस.जी.वाडेकर, नायब तहसीलदार श्रीमती एस.पी.गंगावणे नवनिर्माण संस्थेचे प्रकल्प संचालक राजेश ईशी, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी, प्रकल्प व्यवस्थापक समीर, समुपदेशक श्रीमती शितल शक्य किरण वळवी, क्षेत्रीय कार्यकर्ता विकास पाडवी, दिलीप पावरा, शोभा मराठे, हेमंत पगारे, रितेश गावित आदी उपस्थित होते.

यावेळी न्या.सतीश मलिये यांनी नवनिर्माण संस्था व तहसील कार्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीने परिसरात उपक्रम राबवून गरीब गरजू निराधार महिलांना कोरोना काळात अत्यंत चांगले मदत देत असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी योजनेत महिलांनाअन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये किलोप्रमाणे गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दरमहा मिळणार असल्याचे सांगितले.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी वैयक्तिक खर्चातून दिवाळी फराळ वाटप केले. यावेळी लाभार्थी म्हणाले, तहसिलदार व नवनिर्माण संस्थेमुळे दिवाळी पूर्वीची दिवाळी आम्हाला साजरी करता येत आहे. तसेच मिठाई आणि तिचा दर्जा यामुळे लाभार्थ्यांमध्ये खुशीचे वातावरण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवी गोसावी यांनी केले. आभार श्रीमती शीतल शक्य यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या