Friday, April 26, 2024
Homeजळगावधुळ्यातील रथोत्सवाची परंपरा दुसर्‍यांदा खंडित

धुळ्यातील रथोत्सवाची परंपरा दुसर्‍यांदा खंडित

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

येथील बालाजी रथोत्सवाला असलेली 139 वर्षांची परंपरा आज दुसर्‍यांदा खंडित झाली. विधीवत पूजा करून रथ फक्त 50 पावले ओढून पुन्हा जागेवर आणण्यात आला.

- Advertisement -

यापूर्वी 5 ऑक्टोबर 2008 रोजी धुळ्यात दोन धर्मीयांमध्ये मोठी दंगल उसळली होती. त्यावेळी सतत तीन दिवस धुळे जळत होते.

तर 24 दिवस शहरात संचारबंदी होती. त्याच कालावधीत आलेला रथोत्सव रद्द करून रथ केवळ जागेवर उभा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होतो.

यंदा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व सण-उत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

त्यानुसार आजचा रथोत्सव रद्द करून जागेवर विधिवत पूजा करण्यात आली. परंपरेनुसार स्व. बाबूलाल बालाराम अग्रवाल यांच्या वारसदारांना पूजेचा मान मिळाला. पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोरोना महामारीमुळे यंदा बालाजींचा रथोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. रथाची मिरवणूक रद्द करण्यात येवून दुपारी 12 वाजता अग्रवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिराच्या मागील दरवाजापासून पुढील दरवाजापर्यंत रथ ओढून रथोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांनी व्यंकट रमणा… गोविंदा… चा जयघोष करण्यात आला.

बालाजी रथोत्सवाला 139 वर्षाची परंपरा आहे. यंदा रथोत्सवाचे 140 वे वर्ष आहे. दसर्‍यानंतर येणार्‍या पाशांकुशा एकदशीला रथाची मिरवणूक काढण्यात येते.

रथोत्सव मिरवणूकीला खोल गल्लीतील बालाजी मंदिरापासून सुरुवात होते. पारंपारीक मार्गावरुन रथ मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते. सुमारे 25 ते 30 तास रथोत्सव मिरवणूक चालते. यात लाखोंची उलाढाल होते.

परंतू यंदा कोरोना महामारीमुळे रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय बालाजी मंदिरातर्फे घेण्यात आला. त्यामुळे साध्या पध्दतीने रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात आले. यंदा रथोत्सव मिरवणूक न काढल्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली.

चोख पोलीस बंदोबस्त

कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्स तसेच गर्दीचे कार्यक्रम, महोत्सव साजरा न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

त्यामुळे बालाजी रथोत्सवानिमित्त गर्दी टाळण्यासाठी बालाजी मंदिराच्या चहूबाजूने बॅरेकेट्स लावण्यात आले होते.

भाविकांना दर्शन घेण्यासाठी केवळ एक मार्ग खुला ठेवला होता. या मार्गावर मास्क लावल्यानंतर प्रवेश दिला जात होता. बालाजींचा रथ पाच पावले तरी ओढला पाहिजे. यामुळे भाविकांची गर्दी झाली होती. परंतू पोलिसांनी बंदोबस्त लावून गर्दी आटोक्यात आणली.

‘यांच्या’मुळे लागते रथाला मोगरी

दरवर्षी बालाजींचा रथोत्सव पारंपारिक मार्गावरुन काढण्यात येतो. त्या मार्गावर वळण येते तसेच आरतीसाठी ठिकठिकाणी रथ थांबविला जातो.

यावेळी रथाला मोगरी लावण्याचे कठीण काम करावे लागते. हे काम दरवर्षी कुठलाही मोबदला न घेता सेवा देणारे मोगरेकरी आहेत.

यंदा ही रथाची मिरवणूक 50 पावले काढण्यात आली. तरी देखील मोगरी लावावीच लागली. जर या मोगरेकरांनी मोगरीच लावली नाही, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वहनाची परंपराही खंडित

दरवर्षी रथोत्सवापुर्वी नवरात्रोत्सवात विविध वहन मिरवणूक शहरातील विविध मार्गावरुन काढली जाते. हे वहन शहरातील वैभवशाली परंपरा मानली जाते. परंतू यंदा कोरोना महामारीमुळे वहनाची परंपरा देखील खंडीत झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या