Thursday, April 25, 2024
Homeनगरराशीन येथील एटीएम मशीन पळवणारे चार तासात जेरबंद

राशीन येथील एटीएम मशीन पळवणारे चार तासात जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील राशीन येथे दोशी पेट्रोल पंपा शेजारी हिताची कंपनीचे एटीएम मशीन पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासांत चार आरोपी जेरबंद केले. त्यांच्याकडून एटीएम मशीन, त्यामध्ये चोरीला गेलेली रोकड असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अविनाश मारुती उंडे (रा.उंडेगाव, ता.बार्शी), सतीश शहाजी खांडेकर (रा. वडनेर, ता. परांडा), महादेव नागेश्वर ऊर्फ नागनाथ सलगर (रा. उंडेगाव, ता.बार्शी) अशी पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तसेच एक विधी संघर्ष बालक यामध्ये आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.3) पहाटे राशीन येथील एटीएम मशीन पाच ते सहा अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने कट करून मशीन रोकडसह चोरून नेण्याची घटना घडली. त्यात 4 लाख 67 हजार रुपयांची रोकड व मशीन असे एकूण 9 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला जाण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांनी तात्काळ या घटनेची माहिती अहमदनगर सोलापूर, पुणे, बीड या सर्व नियंत्रण कक्षांना कळवली. तसेच करपडी फाट्याजवळ नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. करपडी फाट्याजवळ नाकाबंदी करत असताना एटीएम मशीन चोरून नेणारे पिकअप त्यांना दिसले. मात्र चोरट्यांनी हातातील शस्त्र त्यांच्यावर उगारून पिकअप वाहन पळवून नेले. चोरी केलेले मशीन आणि पिकअप वाहन रेल्वे स्टेशन वाकाव, तालुका माढा याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस पथकाने नागरिकांच्या मदतीने पिकअप वाहन व आरोपींना पकडून कर्जत येथे आणले.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, मंगेश नागरगोजे , प्रदीप बोराडे, संभाजी वाबळे, पांडुरंग भांडवलकर, रवींद्र वाघ, दीपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, अर्जुन पोकळे, नितीन धस, मनोज मुरकुटे, विशाल क्षीरसागर, अमोल रायकर, राणी व्यवहारे व माढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खंडाळे,पोलीस कॉन्स्टेबल संजय घोळवे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या