Friday, April 26, 2024
Homeनगरडॉ. तनपुरे कारखान्यावर विखेंच्या हस्तक्षेपाचा आरोप करणारांनी नगरपरिषदेतील हस्तक्षेप थांबवावा

डॉ. तनपुरे कारखान्यावर विखेंच्या हस्तक्षेपाचा आरोप करणारांनी नगरपरिषदेतील हस्तक्षेप थांबवावा

उंबरे |वार्ताहर| Umbare

डॉ. तनपुरे कारखान्यावर प्रशासक नेमल्यापासून विखे कुटुंबियांतील कुणीही या कारखान्याच्या अथवा शिक्षण संस्थेच्या कोणत्याही कारभारामध्ये हस्तक्षेप केलेला नाही अथवा त्यांचे कुटुंबीय तिथे आलेले देखील नाही. हस्तक्षेपाचा आरोप करणारे स्वतः नगरपरिषदेच्या कारभारात तेथे जाऊन हस्तक्षेप करतात हे त्यांना कळत नाही का? असा प्रश्न विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी उपस्थित केलेला आहे.

- Advertisement -

तनपुरे यांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी विखे हे डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या व शिक्षण संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करतात, अशी बातमी पाहायला मिळाली. मात्र, यात कोणतीही सत्यता नाही. उलट कारखाना बचाव कृती समिती यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना बंद झाल्याने प्रशासक नेमला गेला. याआधी प्रशासक नेमला गेला होता. त्यावेळी सभासद जनतेच्या आग्रहास्तव खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लावून जनतेच्या व सभासदांच्या आशीर्वादाने ही निवडणूक जिंकली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कारखाना सुरू करून दाखवला व त्यांच्या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मागील एफआरपीचे बारा कोटी रुपये दिले.

जिल्हा सहकारी बँकेच्या थकीत कर्जापोटी पन्नास कोटी रुपये बँकेत भरले आहेत. 60 कोटी रुपये कामगारांना पगारापोटी दिलेले आहेत. कामगारांच्या पीएफ फंडाची रक्कम नऊ कोटी रुपये त्याच कालावधीमध्ये भरले गेले. कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीचे व नुतनीकरणासाठी 12 कोटी रुपये खर्च केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे थकीत देणे त्यांनी दिले. कामगारांना पगारवाढ केली. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट या संस्थेच्या एकूण कर्मचार्‍यांचे डॉ.सुजय विखे पाटील हे सत्तेवर असताना आधीचे 18 पगार थकलेले होते ते पूर्ववत करून आज हे कॉलेज सुस्थितीत आणले आहे. नर्सिंग होम ट्रस्ट या संस्थेची सुमारे साडेपाच कोटी देणी होती, ती सर्व देऊन अद्ययावत नवीन इमारत विखे यांनी उभारले आहे. असे असताना कारखाना बचाव कृती समिती गोंडस नावाखाली स्थापन केलेल्या बचाव समितीने ज्यांनी कारखाना बंद पाडला.

त्यांच्या मदतीने कारखान्याला वेळोवेळी बदनाम करून कारखान्यावर प्रशासक यावे म्हणून याचिका दाखल केली व कारखान्यावर प्रशासक त्यामुळे आणला गेला. अशा पद्धतीने कारखाना कधीच सुरळीत होऊ नये व त्यांचा खाजगी कारखाना जोरात चालवा म्हणूनही षडयंत्र रचण्याचे काम विरोधकांनी केलेले आहे. काही कामगारांना विखे गटाचे आहात म्हणून दम दिला जात आहे व तुम्ही उद्यापासून येऊ नका असे सांगितले जात आहे. आपण व आपले कुटुंबीय राहुरी नगर परिषदेमध्ये प्रशासक असताना देखील तेथे ठिय्या मांडून या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत आहात हे देखील जनता जाणून आहे. म्हणून आता कमीत कमी आपण हा हस्तक्षेप तरी बंद करावा व प्रशासकांना त्यांच्या पद्धतीने योग्य काम करून द्यावे, असे आवाहन तनपुरे यांनी यावेळी केले.

यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, उदयसिंह पाटील, माजी व्हा. चेअरमन शामराव निमसे, दत्तात्रय ढुस, मुळा प्रवराचे संचालक आर. आर. तनपुरे, राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते शिवाजीराव सोनवणे, पंचायत समितीचे संचालक सुरेश बानकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या