Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाRanji Trophy 2022 : नाशिकचा सत्यजित यंदादेखील महाराष्ट्र संघात

Ranji Trophy 2022 : नाशिकचा सत्यजित यंदादेखील महाराष्ट्र संघात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav) याची यावर्षीदेखील महाराष्ट्र संघातर्फे (Maharashtra Team) रणजी ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे…

- Advertisement -

भारतीय क्रिकेट नियामक मंडळतर्फे (BCCI) आयोजित नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत (T20 Series), लखनौ (Lucknow) येथे एलिट ए गटातील सामन्यांत सत्यजित ने ६ सामन्यात २२ षटकांत ७ बळी घेतले.

या स्पर्धेत गोवा व पुदुचेरी संघांविरुद्ध अनुक्रमे ३ व २ बळी घेऊन महाराष्ट्र संघाच्या मोठ्या विजयांत सत्यजितने महत्वाचा वाटा उचलला. त्यानंतरच्या एकदिवसीय विजय हजारे स्पर्धेत पायाच्या दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही.

आता मात्र सत्यजित पूर्णपणे फिट असून महाराष्ट्र संघातर्फे जोरदार कामगिरी करण्यास पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. मागील दोन, तीन रणजी हंगामात केलेल्या उत्कृष्ट, सातत्यपुर्ण कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे.

प्रथम श्रेणी सामन्यांत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना सत्यजितने आतापर्यंत २३ सामन्यांत ७८ बळी घेतले आहेत. एका डावात ५ बळी घेण्याचा दोनदा पराक्रम, तर पाच वेळा ४ गडी बाद करण्याची जोरदार कामगिरी नाशिकच्या या डावखुर्‍या फिरकी पटूने केली आहे.

त्याबरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीनेदेखील संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी आपला वाटा उचलत असतो. आतापर्यंत ६७ या सर्वोच्च धावसंख्येसह त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत.

दि. १३ जानेवारीपासून कोलकाता येथे मुंबईविरुद्धच्या सामन्याने महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यास सुरुवात होत आहे. त्यानंतर उत्तराखंड २० जानेवारी, कर्नाटक २७ जानेवारी, दिल्ली ३ फेब्रुवारी व हैदराबाद १० फेब्रुवारी अशा बलाढ्य संघांबरोबर लढती नियोजित आहेत.

सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा (Vinod Shah), सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या