Friday, April 26, 2024
Homeजळगावअगं बाईऽऽ, चक्क नणंद-भावजईत ठिणगी !

अगं बाईऽऽ, चक्क नणंद-भावजईत ठिणगी !

रवींद्र पाटील

जळगाव । Jalgaon

- Advertisement -

राजकारण मोठे विचित्र असते. एकेकाळी खडसे परिवारातील सर्वजण भाजपाचे गुणगाण करताना थांबत नव्हते. मात्र, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर परिस्थिती बदलली. मुलगी रोहिणी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेली तर सून खासदार रक्षाताई मात्र भाजपात असल्याने आता एकाच घरात टीका-टिप्पणी सुरु झाली आहे.

आज ओबीसी आरक्षणावरून नणंद-भावजईच आमने-सामने आल्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ओबीसी नेत्यांना संपविले आणि तेच आज ओबीसी आरक्षणासाठी गळा काढत आहे, असा वार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला. रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्या पक्षामुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले. मात्र, पक्षानेच त्यांना भाजपाविरोधात बोलायला सांगितले असेल त्यामुळे त्या बोलल्या असतील; असा पलटवार खा.रक्षा खडसे यांनी केला.

राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगली आहे. त्यातच भाजपाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.त्याचे जिल्ह्यातील नेतृत्व खा.रक्षा खडसे करीत आहेत, त्यामुळे त्या आघाडी सरकारवर टीका करीत आहेत. त्याला आज त्यांच्या नणंदबाई, राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी जोरदार टोला मारला आहे.

भाजपाला ओबीसींचा कधीपासून कळवळा यायला लागला? असे ट्वीट त्यांनी केले असता त्यावर खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी, रोहिणी खडसे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने त्यांना पक्षाने सांगितले म्हणून त्या बोलत असाव्यात, असा प्रतिटोला लगावला आहे.

खडसे यांच्या घरातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद-भावजय यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपातर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे ट्वीट रोहिणी खडसे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या