Friday, April 26, 2024
Homeनगररामनवमी यात्रोत्सव अध्यक्षाबाबतचे सर्व अधिकार नामदार विखे यांनाच

रामनवमी यात्रोत्सव अध्यक्षाबाबतचे सर्व अधिकार नामदार विखे यांनाच

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी रामनवमी यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या वाद अनेक बैठकानंतर मिटत नसल्यामुळे अखेर सार्वमतने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ह्या अध्यक्षपदाचा वाद महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या कोर्टात गेला आणि महसूलमंत्री सोमवारी शिर्डीत आले असता दोन्ही गटाने आपली भूमिका त्यांच्या समोर मांडत अध्यक्ष हा आमचाच व्हावा अशी आग्रही भूमिका घेत आपण योग्य तो न्याय करावा अशी विनंती दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांनी केली. मात्र ना. विखे पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत कुठलाही निर्णय दिला नाही ते अध्यक्ष निवडीबाबत दोन दिवसांनी निर्णय देणार असून त्यांच्या निर्णयाची शिर्डीकरांना उत्कंठा लागली आहे.

- Advertisement -

रामनवमी यात्रा उत्सव अध्यक्ष निवडीचा वाद गेल्या सहा दिवसांपासून सुरू आहे तो मिटत नसल्याने या दोन्ही गटातील काही पदाधिकारी व ग्रामस्थांनी हा वाद ना. विखे पाटील यांनी सोडवावा अशी मागणी केली होती. सोमवारी रात्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दोन्ही गटाची दोन ठिकाणी स्वतंत्र बैठक घेत दोघांच्या भावना समजून घेतल्या प्रथम शिवाजी गोंदकर, अभय शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, प्रमोद गोंदकर यांच्या गटाची भूमिका ऐकूण घेत दुसर्‍या गटाची बाजू कैलासबापू कोते व कमलाकर कोते यांची जाणून घेऊन दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांना श्रद्धा व सबुरीचा सल्ला देत श्रीरामनवमी उत्सव आनंदात पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आणि दोन्ही गटांनी अध्यक्षपदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविल्याने ना. विखे पाटील यांनी सोमवारी याबाबत कुठल्याही निर्णय दिला नाही. ना. विखे पाटील यांनी दोन्ही गटातील पदाधिकार्‍यांशी बोलताना म्हणाले की, शिर्डीचा विकास अधिक होण्याकरिता आपण केंद्र व सरकारच्या माध्यमातून विविध योजना आणण्याचे काम करीत आहोत. आपणही शहराच्या विकास अधिक कसा होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावा. अध्यक्षपदाच्या वादात अडकू नये असा मार्मिक सल्ला यावेळी ना .विखे पाटील यांनी दोन्ही गटाच्या पदाधिकारी यांना दिला.

यावेळी महसूलमंत्री विखे पाटील हे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील असे दोन्ही गटाच्या पदाधिकारी यांनी सांगितल्याने रामनवमी उत्सव अध्यक्ष निवडीबाबत ना.विखे पाटील काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामनवमी उत्सव अध्यक्षचा वाद गेल्या चार ते पाच दिवसापासून सुटत नसल्यामुळे हा वाद ना. विखे पाटील यांचा कोर्टात गेल्यावरच सुटेल असे वृत्त दैनिक सार्वमत ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. अखेर दैनिक सार्वमतने प्रसिद्ध केलेले वृत्त खरे ठरले.

- Advertisment -

ताज्या बातम्या