Friday, April 26, 2024
Homeनगरसमाज प्रबोधनकार रामदास महाराज ब्रम्हलीन

समाज प्रबोधनकार रामदास महाराज ब्रम्हलीन

लोणी/कोल्हार |वार्ताहर| Loni| Kolhar

राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचे पुतणे आणि प्रबोधनकार रामदास महाराज जाधव (कैकाडी) पंढरपूर हे शुक्रवारी अल्पशा आजारानंतर अखेरचा श्वास घेत ब्रम्हलीन झाले. ते 72 वर्षांचे होते.

- Advertisement -

गेल्या आठ दिवसांपासून रामदास महाराज अकलूज येथील रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र शुक्रवार दि. 25 रोजी दुपारी 4 वा. त्यांनी जगाचा निरोप घेतला. राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या विचार आणि प्रबोधनाचा वारसा गेली पाच दशके सक्षमपणे चालवताना रामदास महाराज यांनी अंधश्रद्धा, जादूटोणा आणि कर्मकांडावर आसूड ओढले.

जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवन, चरित्र आणि गाथा यांचा सध्या सोप्या भाषेत प्रचार, प्रसार करताना त्यांनी महाराष्ट्रातील एकही गाव सोडले नाही. संत तुकाराम महाराज यांचे विचारच जगाला तारू शकतात असा विश्वास त्यांनी जनामनात रुजवला. तुकाराम महाराजांचे चरित्र विकृतपणे समाजापुढे मांडणारांचा त्यांनी वेळोवेळी चांगलाच समाचार घेतला. स्पष्टवक्तेपणा आणि सोपी भाषा यामुळे त्यांच्या किर्तनांना हजारो भाविक उपस्थित असायचे. वाईट रूढी परंपरा यांच्या विरोधात त्यांनी जनआंदोलन पुकारले होते.

मनमाड ते पंढरपूर हा कैकाडी बाबांनी सुरू केलेला पायी दिंडी सोहळा रामदास महाराज यांनी पाच दशके अखंडपणे चालवला. पंढरपूर ते देहू हा पायी दिंडी सोहळा तुकाराम बिजेनिमित्त त्यांनी सुरू केला.

देहू येथे 11 हजार वारकर्‍यांना तुकाराम गाथा पारायणात वाचक म्हणून सहभागी करून घेत त्यांनी प्रत्येक वाचकाला स्वतः निर्मित केलेली वैष्णव वेद ही तुकाराम महाराज चरित्र व अभंग गाथा भेट देऊन वारकरी संप्रदायात नवा इतिहास निर्माण केला.हजारो कीर्तन-प्रवचनातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्यासाठी अपार कष्ट घेतले.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तुकाराम गाथेच्या पारायणासाठी संघर्ष करून यश मिळवले व नवा इतिहास घडवला. बहुजन समाजाला कर्मकांडाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी केलेले समाज प्रबोधन अत्यंत मोलाचे ठरले आहे.

मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्याशी ते जोडलेले होते. पंढरपूर येथील त्यांचा मठ बघण्यासाठी दररोज शेकडो भाविक गर्दी करतात.पंढरीच्या वारीला गेलेला भाविक हा मठ बघितल्याशिवाय माघारी परतत नाही इतकी अप्रतिम रचना या मठाची करण्यात आलेली आहे. हभप रामदास महाराज यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली असून त्यांची जागा कधीच भरली जाऊ शकणार नाही.

रामदास महाराजांच्या आयुष्यात माता, पिता, थोर साहित्यिक स्व. प्रा. टी. के. जाधव, स्व. वाल्मिक जाधव, थोरला मुलगा स्व. संजय यांच्या अकाली निधनाचे दुःखद प्रसंग आले, मात्र रामदास महाराज या दुःखद घटनांना धैर्याने सामोरे गेले. कोल्हार भगवतीपूर येथील पत्रकार दादासाहेब कोळसे व डी. के. खर्डे यांच्या सहकार्याने रामदास महाराजांनी कोल्हार भगवतीपूर, राहाता, श्रीरामपूर, राहुरी येथे संतकथांचे आयोजन केले होते.

लोणीकरांशी अतूट नाते

रामदास महाराज यांचे लोणी गावाशी अतूट नाते होते. कै. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे कैकाडी बाबांशी तर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा रामदास महाराज यांच्याशी विशेष स्नेह होता. लोणी येथील वार्षिक हरिनाम सप्ताहात रामदास महाराज यांचे दरवर्षी कीर्तन असायचे. त्यांनी या सप्ताहात संत चरित्र कथाही काही वर्षांपूर्वी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांनी लोणीत दिलेले व्याख्यान आजही प्रयेकाच्या स्मरणात आहे. लोणी बुद्रुक येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन रामदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने या परिसरातील प्रत्येक व्यक्ती हळहळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या