रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षात केवळ तीन वेळा मंत्रालयात आले, कोकणात (Kokan) वादळ आले, अस्मानी संकट आले तेव्हा कोकणवासीयांची अश्रू पुसायला त्यांना वेळ नव्हता.

शरद पवारांसारखा (Sharad Pawar) नेता कोकणात आला मात्र उद्धव ठाकरे अश्रू पुसण्यासाठी कोकणात आले नाहीत. आता बाप बेटे बाहेर पडत आहे अशी टीका शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम कधीच झाले नाही, असेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला, असे काम मुख्यमंत्री शिंदे यांचे सुरू आहे. तातडीने निर्णय घेतले जात आहेत. दिवसरात्र काम करत आहेत, मंत्रालयात लोकाना भेटत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील नागरिकांना भेटत आहेत असेही त्यांनी सांगितले. तसेच अजित पवार (Ajit Pawar) जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना संपवत होते तेव्हा आमदारांचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती, अशी टीकाही कदम यांनी केली.