उध्दव ठाकरे एनडीएत आले तर मुख्यमंत्री करण्यासाठी मध्यस्थी करू – आठवले

jalgaon-digital
3 Min Read

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

महाविकास आघाडीत मतभेद आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही. उद्धव ठाकरे जर पुन्हा एनडीएत आले

तर त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी मध्यस्थाची भूमिका करून वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत सांगितले. उद्धव ठाकरे जास्त दिवस महाविकास आघाडीसोबत राहिल्यास शिवसेनेेेला परवडणार नाही. मी शिर्डीमध्ये पुन्हा येईल, असे म्हणत रामदास आठवले यांनी भविष्यात पुन्हा शिर्डी लोकसभा लढण्याचे संकेत दिले.

शिर्डीत आरपीआयच्या उत्तर महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी विजय वाकचौरे, काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, रमेश मकासरे, विश्वनाथ काळे, प्रकाश जोरे, दिपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, राहुल वाघमारे, सुरेंद्र थोरात, भिमा बागुल, सुनील साळवे आदींची उपस्थित होती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. आठवले यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये आरपीआय अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. आम्ही भाजपबरोबर निवडणूक लढवणार असून भाजपला दोनशे जागा मिळतील, असे भाकित करत भाजपने आम्हाला पश्चिम बंगालमध्ये 10 जागा द्याव्या, अशी मागणी आपण भाजपकडे करणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत न्यायालयात ठाकरे सरकारने व्यवस्थित बाजू मांडली नाही. मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, असे आठवले म्हणाले.

ईडीची (सक्त वसुली संचनालय) नोटीस आल्यानंतर राऊत यांनी आ देखे जरा किसमे कितना दम, असे ट्विट केले होते. यावर हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम, अशा शायरी अंदाजात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले. इडीची नोटीस आणि सरकारचा कोणताही संबंध नाही.

इडी कोणावरही मुद्दाम कारवाई करत नाही. ज्या ठिकाणी अनियमितता तेथे कारवाई होते. एकनाथ खडसे यांना पक्ष सोडल्यामुळे इडीची नोटीस नाही, असे त्यांनी सांगितले. तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम न करता एकमेकांवर टीका करत आहे. युपीएच्या नेतृत्व मुद्यावरून काँग्रेसच पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. हे सरकार पडलं की आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असे यावेळी आठवले यांनी सांगितले.

महाविकास आघाडीसोबत जाऊ नका

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडी सोबत जावे मात्र महाविकास आघाडीसोबत जावू नये, अशी रिपाइंची भूमिका असल्याचे ना. आठवले यांनी स्पष्ट केले.

अकार्यक्षम पदाधिकार्‍यांना पदमुक्त करणार

रिपाइं पुढे चालवायचा निर्धार व्यक्त करताना पक्षात काही प्रमाणात गटबाजी आहे. मात्र ती लवकरच दूर होईल. शिर्डीतील बैठक त्यासाठीच आहे. सदस्य संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार असून जे कार्यकर्ते सदस्य वाढीसाठी काम करणार नाहीत त्यांना पदमुक्त करू, असेही ना.आठवले म्हणाले.

मी पित नाही बिडी मग कशी लागेल इडी

यावेळी पत्रकारांनी ना. आठवले यांना विचारले तुम्हाला इडीची नोटीस आली का यावर आठवले यांनी भन्नाट कविता करत म्हटले, मी पित नाही बिडी मग माझ्या मागे कशी लागेल इडी, असे म्हणताच एकच हशा पिकला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *