Friday, April 26, 2024
Homeनगरराळेगणसिद्धी आणि हिवरे बाजारात दुरंगी लढत

राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजारात दुरंगी लढत

पारनेर (तालुका प्रतिनिधी) –

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. याच रणधुमाळीत देशात प्रसिद्ध असलेल्या

- Advertisement -

राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या दोन गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे तर नगर तालुक्यातील हिवरे बाजार हे पद्मश्री पोपटराव पवार यांचे गाव आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक जाहीर होताच आ. निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणार्‍या गावांना 25 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी नगरसह पारनेर तालुक्यातील गावोगावच्या पुढार्‍यांच्या बैठका घेतल्या. सुरुवातीच्या टप्प्यात 30 ग्रामपंचायती बिनविरोध होतील, असे सांगितले जात होते. राळेगण सिद्धी येथे दस्तुरखुद्द ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. लंके यांनी बैठका घेतल्या. बैठकीत सर्वानुमते ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे मान्यही करण्यात आले. परंतु, गावातील काहींचे समाधान न झाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांनी मी आमदार निलेश लंके यांच्या बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असल्याचे म्हटले होते. राळेगणसिद्धी ग्रामपंचायत 20 वर्षांपासून बिनविरोध होत आहे. परंतु आता या गावात निवडणूक होणार आहे. दरम्यान आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून पारनेर तालुक्यातील काही गावे बिनविरोध झाली.

पारनेर तालुक्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून औपचारिकता बाकी आहे. तर 6 गावांतील एका जागेमुळे त्या गावची निवडणूक लागली आहे. आ. लंके यांचे स्वत:चे गाव असणारे हंगा ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. तर दुपारनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. या आवाहनास पारनेर तालुक्यातील 9 गावांनी प्रतिसाद दिला. तालुक्यातील हंगा, रांधे, शिरापूर, कारेगाव, वेसदरे, पिंप्री पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा व पळसपूर ही गावे बिनविरोध झाली असल्याची माहिती मिळाली आहे.तर तालुक्यातील पाबळ, जातेगाव, वडगाव दर्या, माळकुप, डिकसळ आणि पठारवाडी या 6 गावांतील एका जागेसाठी निवडणूक लागली आहे.

परिवर्तन पॅनलने केली पोलीस संरक्षणाची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार येथे तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही निवडणूक लढवत असणार्‍या परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना जीवाची भीती वाटते, असे निवेदनच परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिवरेबाजार गावच्या 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता गावच्या विकासासाठी स्वतंत्रपणे परिवर्तन ग्रामविकास पॅनलची निर्मिती करून पॅनल अंतर्गत आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आम्ही स्वतंत्र पॅनल उभा केला म्हणून आम्हाला फारमोठ्या प्रमाणात राजकीय विरोध सुरू झाला आहे. त्यातूनच आम्हास धमकावले जात आहे. तसेच आमच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करण्याची दाट शक्यता आहे.

तसेच गावामध्ये निवडणुकीच्या दरम्यान राजकीय वाद उपस्थित करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. आमच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक सनदशीर मार्गाने पार पडण्यासाठी व आमच्या जीवाला राजकीय विरोधक यांच्याकडून धोका निर्माण झाला असल्याने सदर निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडणूक होईपर्यंत पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक व गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आम्ही स्वतंत्रपणे पॅनल उभा करून ग्रामपंचायत निवडणूक लढवत असल्याने त्याबाबत गावातील राजकीय विरोधकांच्या यांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे, व तशा पद्धतीने गावामध्ये चर्चा घडवून आणली जात आहे. त्यामुळे ते कधी काय कृती करतील याचा नेम नाही. तरी आमच्या अर्जाचा गांभीर्याने विचार करून आम्हास सदर ग्रामपंचायत निवडणूक 2021 चे निवडणूक कालावधीसाठी व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच यांची निवड होईपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या